माकडांसोबत सेल्फीचा मोह, शिक्षक ५०० फूट खोल दरीत कोसळले

पुणे : वरंध घाटात माकडासोबत सेल्फी काढण्याच्या नादात शिक्षकाचा ५०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यु झाला आहे. अब्दुल कुदबुद्दीन शेख (वय.४० रा. लातूर ) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक अब्दूल शेख हे मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर त्यांनी पत्नी या करंजावणे (ता. वेल्हे) येथे प्राथमिक शिक्षीका म्हणूक कार्यरत आहेत. काही दिवसांपासून ते नसरापूर येथे राहात होते. शनिवारी ते नसरापूरला आले आणि मंगळवारी दुपारी आपल्या वाहनामधून पुन्हा मंडनगडला निघाले. वरंधा घाटातील वाघजाई मंदीरासमोर ते नेहमीच थांबतात. मंगळवारी देखील सायंकाळी पाचच्या सुमारास ते तेथे थांबले होते.

अन् दरीत कोसळले
अशात त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. ही सेल्फी आपल्या जीवावर बेतेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. घाटातील माकडांना खाऊ देऊन ते त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते सुमारे ५०० फूट दरीत  कोसळले.

दरीत डोकावून पाहिलं असता..
शांतता असल्याने कोणालाही याची खबर लागली नाही. बराच वेळ त्यांची मोटार उभी असल्यामुळे ते दरीत पडले असावेत हे एकाच्या लक्षात आले. दरीत डोकावून पाहिल्यानंतर काही पडल्याचे दिसले नाही. त्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीम, महाडमधील साईकॅप सोल ऍण्डव्हेंचर आणि पोलादपूर येथील साळुंके रेस्क्यू टीमचे सदस्यही रात्री घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. भोरचे पोलीस हवालदार उद्धव गायकवाड आणि विकास लगस यांनी रेस्क्यू टीमसोबत दरीत शोध घेतला.

तब्बल सहा तासांनंतर मृत्यूदेह..
तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना दरीत शेख यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यांची ओळख पटल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.