पावसाने विश्रांती घेताच जळगावचा पारा वाढला; आता पाऊस कधी पडणार?

जळगाव । दोन आठवड्यांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. पावसाने उसंती घेताच जळगावच्या तापमानात वाढ झाली होती. यामुळे उकाडा वाढला होता. परंतु आजपासून आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज ११ आणि १२ जुलै रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर १३, १४ तारखेला जिल्ह्यासह शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळी पाऊस हजेरी लावू शकतो. त्यानंतर पुन्हा १५ आणि १६ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दरम्यान, जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश पेरण्या मार्गी लागल्या. दरम्यान जळगावात मंगळवारी ३० अंशाखाली गेलेलं तापमान बुधवारी ३२.४ अंश सेल्सिअसवर गेलं होते. यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे.