पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि एकमेकांप्रती समर्पण असले तरीही अनेकदा मतभेद आणि वाद होतात. काही वेळा हे वाद तात्पुरते असतात, तर काही प्रसंगी ते इतके तीव्र होतात की, संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बिघडते. काही प्रकरणांमध्ये हे वाद कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनांपर्यंतही जातात.
अश्याच एक घटनेत, पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी त्याच्या लहान भावाचा तिलक समारंभ सुरू होता. कौटुंबिक वादातून सुभाष चौहान (३५) या तरुणाने मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नी सोडून गेल्यानंतर नैराश्यात टोकाचे पाऊल
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सुभाषचा पत्नीशी घरगुती कारणावरून वाद झाला होता. वाद एवढा वाढला की, रागाच्या भरात सुभाषने पत्नीला मारहाण केली. या घटनेमुळे पत्नी प्रचंड अस्वस्थ झाली आणि आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. पत्नी घर सोडून गेल्यानंतर सुभाष मानसिक तणावात गेला आणि नैराश्याने ग्रस्त झाला. कुटुंबीय तिलक समारंभात व्यस्त असताना त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा :Jalgaon News: मित्राला फोन करून विचारले ‘तू कुठे आहेस?’ अन् तरुणाने घेतला गळफास, परिसरात खळबळ
बहिण गेली तेव्हा उघडकीस आली घटना
सुभाषच्या कुटुंबात त्या दिवशी तिलक समारंभ सुरू असल्याने घरातील सर्व सदस्य त्या तयारीत मग्न होते. सुभाष मात्र त्या समारंभात सहभागी झाला नव्हता. कुटुंबीयांपासून वेगळे राहणाऱ्या सुभाषच्या घरी त्याची बहिण काही आवश्यक वस्तू आणण्यासाठी गेली असता, तिला सुभाषचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही धक्कादायक घटना पाहून तिने आरडाओरड केली. कुटुंबीय घटनास्थळी धावून आले आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलीस तपास सुरू
बलिया जिल्ह्यातील सुखपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिड्ढा गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरले. सुखपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पत्नीने घर सोडून गेल्यानंतर सुभाष मानसिक तणावात गेला होता. त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण काय होते, सुभाषच्या आयुष्यात अजून काही तणावाचे कारण होते का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, कुटुंबीयांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.