Jalgaon News : वेळ आली होती, पण काळ नव्हे; ट्रॅकमॅनच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

जळगाव । रेल्वे स्थानकावर एका ट्रॅकमॅनच्या प्रसंगावधानामुळे धावत्या एस्प्रेसला ओढल्या जाणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. बुधवार, २५ रोजी सकाळी ११.०० वा. ट्रेन क्रमांक 12833 (अहमदाबाद – हावडा) जळगाव स्थानकावरून सुटत असताना, हा प्रकार घडला. ट्रॅकमॅनने सतर्कता दाखवत ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकलेल्या प्रवाशाला ओढून त्यांचे प्राण वाचवले.

जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वा. ट्रेन क्रमांक 12833 (अहमदाबाद – हावडा) जळगाव स्थानकावरून सुटत असताना, B 5 कोचच्या दरवाजाजवळ एक प्रवासी लटकत होता आणि त्याचे पाय ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या दरम्यान अडकले होते. त्याला घसरताना पाहून ट्रॅकमॅन गजानन बाबूसिंह पाटील यांनी तत्परतेने त्याला सुरक्षित बाहेर ओढून त्याचे प्राण वाचवले.

घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे एएसआय शिवपूजन सिंग यांनी प्रवाशाची चौकशी केली. प्रवाशाचे नाव प्रकाश रामचंदानी (वय 58 वर्षे) असून ते नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.   रामचंदानी यांनी जळगाव ते नांदुरा प्रवासासाठी पास घेतला होता.

त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीचा सल्ला देण्यात आला, परंतु त्यांना कोणतीही शारीरिक अस्वस्थता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची प्रवासाची गाडी सुरू ठेवण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने ट्रॅकमॅन गजानन बाबूसिंह पाटील यांच्या या साहसिक व तत्परतेच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला असून प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करा व डब्याच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करण्याचे टाळा. आपली सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता आहे, असे  आवाहन रेल्वे प्रशासने केले.