तरुण भारत लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । मराठी वृत्तपत्र इतिहासात आतापर्यंत किती तरी साप्ताहिक नव्याने सुरू झाले. अनेक नव्या दैनिकांनी जन्म घेतला, जसे जन्मले तसे काही कालावधीनंतर बंद पडले. बंद पडण्याचे एकमेव कारण. वाचक वर्ग नाही. खप नाही. खप नाही म्हणून जाहिराती नाहीत. जाहिराती नाहीत म्हणजे उत्पन्नाची टंचाई. आणि या उत्पन्नावर तर मालकाचा नफा कर्मचाऱ्याचे पगार, कागदाचा खर्च, छपाईचा खर्च चालतो.
मात्र, वाचक आहेत. बऱ्या पैकी उत्पन्न आहेत. अनेक वर्षांपासून नियमित, चांगल्या दर्जाचे चमकदार कागदावर अंक निघत असूनही एक मोठ्या खपाचे साप्ताहिक बंद पडले. कारण समजेल तर तुम्ही चकित व्हाल! या वाचक प्रिय साप्ताहिकाला संपादक मिळेना. म्हणून ते बंद करावे लागले. अखेरच्या संपादकाने वाचकांना संबोधित करताना आपल्या अग्रलेखात संपादक मिळत नाही, म्हणून नाईलाजाने अखेरचा निरोप घ्यावा लागत असल्याचे नमूद केले.
या साप्ताहिकाचे नाव चित्रलेखा. अतिशय आकर्षक प्रिंटिंग वाचनीय कव्हर स्टोरी, माहितीपूर्ण सदरे दर्जेदार छायाचित्रे यामुळे हा अंक चांगल्यापैकी वाचक प्रिय होता. नारायण आठवले “उर्फ अनिरुद्ध पुनर्वसू” हे संपादक असतानाच्या काळात चित्रलेखाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. अनेक लोकप्रिय दैनिकांच्या रविवार पुरवण्यांना यशस्वी टक्कर देत चित्रलेखा आपला खप टिकवून होते.
नंतरच्या काळात ज्ञानेश महाराव हे संपादक झाले. त्यांच्या सुरवातीच्या काळात वाचक वर्ग टिकून होता. अंकाचा दर्जा सांभाळला जात होता मात्र, महाराव यांच्या पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव चित्रलेखावर जास्ती पडू लागला. इतिहासाशी, पुराणांशी छेडछाड करणारे वादग्रस्त लेख अंकात जास्ती जागा घेऊ लागले. नवपुरोगामी विचारसरणीचे अनेक नवलेखक चित्रलेखाच्या व्यासपीठावरून भडक आणि जातीयवादाला खतपाणी घालणारे विधाने खपवू लागले.
जेष्ठ पत्रकार रवींद्र मुळे म्हणतात की, वृत्तपत्रांमधली वाचकांना जे पाहिजे ते देण्याची वाढती स्पर्धा, लक्षात न घेता आपल्याला पाहिजे तीच मते वाचकांवर लादण्यामुळे चित्रलेखाचा नियमित आणि पारंपरिक वाचक दुरावला गेला. मुळे यांच्या मताचा पत्रकारांनी गांभीर्याने विचार केला पाहीजे.
पुरोगामी मंडळींनी चित्रलेखाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरवात केली मात्र, खप वाढण्याच्या नावाने शून्य. अंक विकत घेण्याच्या ऐवजी संपादकांचे अग्रलेख व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त फिरवण्यात ते धन्यता मानू लागले. लातूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे असे म्हणतात की, प्रसार माध्यमं ही समाजासाठी आरसा असतात. परंतु, यावेळी एखाद्या अंकाचा चेहरा हा समाजाचा आरसा समजून आपल्याला पाहिजे तसे मुखवटे धारण करून समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी जेव्हा अयशस्वी प्रयत्न करतात तेव्हा त्याचे शेवटचं चित्र आणि लेखाजोखा चित्रलेखेसारखा होतो.
गेल्या काही वर्षांपासून चित्रलेखाचे संपादक महाराव स्वेच्छा निवृत्ती घेऊ इच्छित होते. मॅनेजमेंटलाही त्यांनी प्रस्ताव दिला होता, तेव्हा पासून मॅनेजमेंटने त्यांना तुम्ही नवा संपादक घेऊन या असे सांगितले. महाराव यांनी त्यांच्या कार्यलयातीलच अनेकांना संपादक पदाची ऑफर दिली. महाराव यांच्याच विचारसरणीच्या अनेक लेखकांना आणि पत्रकारांनाही त्यांनी ऑफर दिली मात्र, ही विचारसरणी असणारा कोणीच संपादकपद स्विकारेना, अखेर नाईलाजाने महाराव यांनी चित्रलेखाच्या अंकात प्रकाशन थांबवत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनुसार २६ डिसेंबर २०२२ रोजी शेवटचा अंक प्रकशित होणार होता.
कोणताही पुरोगामी पत्रकार किंवा लेखक चित्रलेखाचे संपादकपद स्वीकारायला का तयार नव्हते हा वाचकांना पडलेला प्रश्न आहे. ३३वर्षाची परंपरा असणाऱ्या चित्रलेखाचा असा शेवट व्हावा, हे कोणत्याही विचारसरणीच्या वाचकाला खेदजनकच वाटणार आहे.