---Advertisement---
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. या मोहिमेत भारतीय जनता पक्षाचे मंत्री,नेते, पदाधिकारी यांनी हिरीरीने सहभाग घेत सोशल मीडियावर आपल्या प्रोफाईल तिरंग्याचा फोटो लावला आहे. तर विरोधी पक्षनेते यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तिरंगा फडकवीत आहेत असा फोटो प्रोफाईलवर लावला आहे. परंतु, आता याच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरून नवा उफाळून आला आहे.यात हिंदुत्ववादी संघटना आरएसएस तिरंगा विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर खरच तिरंगा ध्वज फडकवला जात नाही का? याबाबत स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनीच माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथे संघ परिवारातील डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे कार्यालय आहे. संघाचे अनेक कार्यक्रम याच कार्यालयात होत असतात. मात्र, महाल परिसरातील संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मारक समिती कार्यालयांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी कधीच तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता, असा आरोप अनेकदा केला जातो. नागपूर मधील अग्रसेन छत्रावासमध्ये काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका विद्यार्थ्याने सरसंघचालक मोहन भागवत यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता.
त्या विद्यार्थ्यांला उत्तर देताना भागवत यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी १९३३ मध्ये जळगावजवळील फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची आठवण सांगितली. या अधिवेशनात पहिल्यांदाच ८० फूट उंच खांबावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम असतानाच, तिरंगा अडकला. त्यावेळी उपस्थित असलेल्या किसन सिंग राजपूत या युवकाने पुढे येत खांबावर चढून झेंडा मोकळा केला आणि तो यशस्वीरित्या फडकवला.
या धाडसी कृतीमुळे सभासदांनी त्याचे जोरदार अभिनंदन करण्यात आले. नेहरूंनी देखील कौतुक करीत दुसऱ्या दिवशी अधिवेशनात त्याचा सत्कार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या तरुणाचा संबंध संघाशी असल्याचे समजताच काँग्रेसने आपली भूमिका बदलली. ही बाब डॉ. हेडगेवार यांना समजल्यावर, प्रवासात असूनही त्यांनी किसन सिंग यांची भेट घेऊन त्याला सन्मानाने भेटवस्तू दिली होती. या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, “तिरंगा फडकवण्याचा केवळ सोहळाच नव्हे, तर त्यामागील राष्ट्रभक्तीचे मूल्य आम्ही आजही जपतो. देशाच्या झेंड्यावर किंवा सार्वभौमत्वावर कोणतेही संकट आले, तर आम्ही आमचे प्राणही देण्यासाठी सज्ज आहोत.”