नागपूर : भरधाव टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील नागरिकांनी टिप्पर जाळत चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी पोलिस वाहन आणि अग्निशमन वाहनांची तोड फोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात सुमित नंदलाल सैनी १८ ) आणि अंजली सैनी (१६) हे भाऊ-बहीण मृत्यूमुखी पडले. हे दोघे दुर्गानगर येथील रहिवासी होते, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातात दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी या ट्रकला आग लावली. अग्निशामक दलाच्या वाहनाकडून या टिप्परवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली.