अमळनेर ः मध्यरात्री पिस्टलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटण्यात आल्याची घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी, 23 मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, तीन जिवंत काडतूस, दुचाकी असा एकूण 77 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रईस शेख उस्मान (40) व आरीफ अहमद शेख (35, दोन्ही रा.आळंद, ता.फुलंब्री, जि.संभाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सीसीटीव्हीवरून व बुटावरून आरोपी जाळ्यात
डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरुवारी मध्यरात्री दोन संशयीतांनी पिस्टल दाखवून सुमारे 36 हजार 500 रुपये लुटून नेले होते तसेच पेट्रोल पंपावर एक कार चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला देखील बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे देखील काढून घेण्यात आले होते. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. शहरातील बिअरबारमध्ये त्यांचा शोध घेण्यात आल्यानंतर बुटावरून त्याची ओळख पटली व संशयित परराज्यात पळण्याच्या बेतात असताना त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शिरोडे, अनिल भुसारे, हवालदार किशोर पाटील, दीपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील, योगेश महाजन, सिध्दांत शिसोदे यांच्या पथकाने केली.