तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । सामाजिक जाणिव असल्या की त्याचे रूप व्यक्तिमत्त्वातून प्रकट होत असते. मग त्यासाठी गाव लहान असले तरी त्याने काही फरक पडत नसतो. सामाजिक काम करता करता फरकांडे (ता. एरंडोल) या लहान गावातील महिला विमलबाई मधुकर कापूरे (वय ७३) यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आणि तो दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण देखील झाला. एका निरक्षर महिलेचा हा निर्धार समाजाच्या भल्यासाठी केलेली अभूतपूर्व अशी कृती म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
विमलबाई व त्यांचे पती मधुकर कापुरे हे फरकांडे या गावी शेती करून कुटूंबाच्या उदरनिर्वाह करत दोन मुले व दोन मुली यांचा सांभाळ करीत त्यांना मोठे केले, लग्न करून कुटूंबाची जबाबदारी पार पाडली. विमलबाई या गर्भवती महिलांच्या नॉर्मल प्रसूती करत असत त्यामुळे परिसरात त्या दाई म्हणून परिचित होत्या. या परिसरात त्यांनी शेकडो महिलांच्या प्रसूती करून सामाजिक एकोपा जोपासण्याचेही व्रत अखेरपर्यंत निभावले मुलांनी शहरात जाऊन लहान मोठा व्यवसाय सुरू करावा, अशी त्यांची ईच्छा होती. त्यानुसार १९९८ यासाली कुटूंबासह त्या जळगावला शिव कॉलनी येथे कायमस्वरूपी मुलगा मुरलीधर उर्फ सुधाकर मधुकर कापुरे व लहान भाऊ कमलाकर कापुरे स्थायिक झाले भांडूप येथील मावसभाऊ प्रकाश वसंत गवांदे यांच्याकडे जाऊन मुरलीधर यांनी जाऊन टेलरिंग कामाचे धडे घेतले. त्यानंतर जळगाव येथे येऊन त्यांनी लहान भाऊ कमलाकरला सोबत घेऊन फुले मार्केटमध्ये जयश्री लेडीज म्हणून दुकान सुरू करून व्यवसाय सुरू केला. तर त्यांच्या मातोश्री विमलबाई यानी हृदयरोग तज्ज्ञ डॉ संजय महाजन यांच्या हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करत कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावला.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. तसेच शिंपी समाज हितवर्धक संस्थेलाही ७५ वर्ष पूर्ण झाली. हा संयोग साधताना वयाची ७५ पूर्ण होवो किंवा ना होवो पण १५ ऑगस्ट २०२२ रोजी कुटूंबासमोर देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त करत संकल्पही केला. आइने बोलून दाखविलेली भावना त्यांच्या मुलांनी नातेवाईक व समाज बांधव यांच्याजवळ व्यक्त करून आईची ईच्छा पूर्ण करण्यास सर्वांनी समती द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर दि. १८ ऑगस्ट २०२२ रोजी शासकीय महाविद्यालय जळगाव येथे कुटूंबियांनी विमलबाई यांचा देहदान फार्म भरून जमा केला. दरम्यान त्यांची अधूनमधून प्रकृती बिघडत असायची. त्यांना डॉ. संजय महाजन यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराती घरी नेले जात होते त्याची प्रकृती अत्यवस्थ होऊन दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. कुटुंबातील सदस्यानी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करीत आईच्या इच्छेची पूर्ती केली.
आरोपांनी कुटूंब व्यथित
पैसे घेऊन कुटूंबियांनी विमलबाई यांचा मृतदेह शासकीय मेडिकल कॉलेजच्या स्वाधीन केले, असा आरोप कापुरे कुटूंबियावर समाजातून काही नातेवाईकांनी केल्याने कुटूंबातील सदस्यांना खूप मनस्ताप व वेदनांचा सामना करावा लागला. तथापि पूर्वी पासून समाजसुधारणेची भूमिका घेतलेल्या अनेक मान्यवरांना सुरुवातीला प्रचंड विरोध झाला होता. त्यानंतर त्यांच्या भूमिका किंवा विचाराला लोकमान्यता मिळालेली आहे. विमलबाई यांनी सुरवातीपासून घेतलेल्या सामाजिक कामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. किंबहुना आरोपकर्ते विमलबाई यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ असतील. असे असले तरी कापुरे कुटूंबियांनी व्यथित होण्याची खरं म्हणजे गरज तरी काय?
रूढीपरंपरेनुसार केला विधी
विमलबाई यांचे देहदान जरी केले तरी कुटूंबातील सदस्यांनी त्यांच्या प्रतिकृती पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले. दशक्रियाविधी तसेच येत्या ०५ डिसेंबर २०२२ रोजी उत्तरकार्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरची भूमिका घेतली
रुढी-परंपरा, समाज सुधारणा आणि विज्ञानवादी दूरदृष्टीकोन विमलबाई यांच्याकडे होता. आदर्शवादी जगण्याची रीत त्यांनी व्यक्तिगत जीवनातून आरंभली होती. महिलांच्या प्रसुती सुलभ व्हावी, यासाठी त्यांनी स्वयं पुढाकार घेत स्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांच्या जीवनात डॉक्टरचा रोल निभावला. त्यांनी त्यासाठी ना कसली फी घेतली, ना कधी या समाजभूषणावह कामाचा उदोउदो केला. या गोष्टी त्यांच्या मनाच्या मोठ्यापणाच्या साक्षी देणाऱ्या आहेत. साधं-सरळ स्वभाव आणि जे केले ते समाजाला काही देणे होते. ते हाताने घडले. व्यक्ती म्हणून ते माझ्याकडून झाले इतकच असा उच्चभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. असामान्य असे त्यांचे व्यक्तीमत्व समाजाला प्रेरणादायी आहे. समाजाच्या उपयुक्ततेसाठी त्यांनी देहदान केला. कापुरे कुटूंबियासाठी ही गौरवास्पद घटना तर आहेच, पण शिकलेल्या, पुढारलेल्या समाजाला विमलबाई यानी सामाजिक हितावह जोपासण्याची जाणीव करून दिली आहे. त्यांनी उचललेले पाऊल समाजाला दिशादर्शक ठरेल यात अजिबात शंका नाही.