जळगावातील व्हायरल व्हिडिओचा अखेर झाला उलगडा

जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला होता. ही घटना शनिवारी सकाळी घडल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलीस वर्तुळातही मोठी खळबळ उडाली. एमआयडीसी पोलिसांनी हल्ला करणार्‍या महिलेचा शोध घेतल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भांडण करणारे दाम्पत्य पती-पत्नी असून पतीने पत्नीला सोडल्याने त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी पोलिसांनीच स्वतःहून या प्रकरणात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सागर भिकन राजगिरे (34) व माधुरी सागर राजगिरे (32, दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

चाकूहल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
जळगाव शहरातील अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ शनिवारी सकाळी 11 ते 1 वाजे दरम्यान एक तरुण व तरुणीचा गोंधळ सुरू होता. यात वादात काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढत तरुणावर वारंवार वार केले मात्र त्यानंतरही तरुणी हल्ला करीतच होती. तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याचे अंगावरील शर्ट फाडून टाकला व तरुणीला माझा खून कर, असे देखील म्हटल्याचे दिसून आले होते.

पत्नीला वागवत नसल्याने हल्ला
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजगिरे दाम्पत्याला लहान मुलगा असून गेल्या काही दिवसांपासून सागर राजगिरे हा पत्नी व मुलाला सोडून अन्यत्र राहत होता व पत्नी त्याचा शोध घेत असतानाच तो शनिवारी अजिंठा चौकात दिसल्यानंतर वादाची घटना घडली. एमआयडीसी पोलिसांनी खबर्‍यांना अ‍ॅक्टीव्हेट करीत महिलेचा शोध घेवून सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी किरण प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, मीनाक्षी घेठे आदींच्या पथकाने केली.