– राहुल गोखले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेचे शताब्दी वर्ष पुढील वर्षी सुरू होईल. अनेक संघटना उभ्या राहतात; मात्र काळाच्या ओघात त्या निरुद्देश्य होतात आणि परिणामत: अस्तंगत होतात. समस्या आणि अस्तित्वाचे प्रश्न सर्वच संघटनांसमोर उभे राहत असतात. त्यांना तोंड देऊन ज्या संघटना मार्गक‘मण निर्धाराने करीत राहतात, त्या केवळ तग धरून राहतात असे नाही तर त्या वर्धिष्णू राहतात. संघ ही या पद्धतीची संघटना. जवळपास शंभर वर्षे एखादी संघटना प्रभावीपणे कार्यरत राहते ही दुर्मिळ बाब. याचे श्रेय निरलसपणे, निष्ठेने, समर्पणाने कार्यरत कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या पिढ्यांना जाते तद्वत ते संघनिर्मात्याच्या द्रष्टेपणालादेखील जाते. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती हिंदू समाजाच्या संघटनेसाठी. मात्र, कोणत्याही संघटनेला महान उद्देश लागतो; तद्वत ध्येयधोरणे लागतात; विचारधारा लागते, तत्त्वांची पायाभरणी करावी लागते; नेतृत्वाचा वस्तुपाठ उभा करावा लागतो; कार्यशैली ठरवावी लागते. ही तटबंदी पक्की असेल तर संघटना सामान्यतः भरकटत नाही आणि निरुद्देश्य होत नाही. (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार यांनी मुळात संघाच्या स्थापनेपासून प्रारंभिक काळात संघटनेची ज्या पद्धतीची बांधणी केली तो वारसा पुढील पिढ्यांनी निगुतीने सांभाळला. गुढीपाडवा हा डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या या अलौकिक आणि द्रष्ट्या कर्तृत्वाचे स्मरण करणे औचित्याचे.
स्वत: अनुशीलन समितीसारख्या क्रांतिकारकांच्या संघटनेत काम केलेले असूनही डॉ. हेडगेवार यांनी सामान्यांना असामान्य कर्तृत्व करण्याची प्रेरणा देणारी संघासारखी संघटना स्थापन केली, हेच मुळात डॉ. हेडगेवार यांचे अनोखेपण. काँग्रेसने भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली होती, हे नाकारता येणार नाही. किंबहुना स्वत: (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार हे केवळ काँग्रेसचे सदस्य होते असे नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी ज्या आंदोलनात आणि सत्याग‘हांमध्ये भाग घेतला होता ती काँग्रेसचीच होती. क्रांतिकार्य झेपणे हे सर्वांना शक्य नसते. काँग्रेसने सत्याग्रहासारख्या अभिनव आंदोलन पद्धतीच्या द्वारे सामान्य नागरिकांनादेखील स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास उद्युक्त केले. मात्र, तरीही त्यात काही मर्यादा होत्या. याचे कारण ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्याचे ध्येय त्यात होते; पण कोणतेही राष्ट्र हे परचक्रातून बाहेर पडले की आपसूकच मोठे होत नसते. समाजात गुणवत्ता असलेले मनुष्यबळ लागते. ही गुणवत्ता म्हणजे केवळ कौशल्य नव्हे तर ध्येयप्रेरित मनुष्यबळ. राष्ट्र उभारणीचे ध्येय असणारे मनुष्यबळ. त्यासाठी समाज संघटित लागतो. असे संघटन व्हायचे तर समाजाचा तेजोभंग करून चालत नाही; पण दुसरीकडे दोषांकडे दुर्लक्षदेखील करून चालत नाही. मा. गो. वैद्य यांनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे स्कायलार्क हा पक्षी जसा उंचावर उडतो आणि त्याचवेळी धरेशीदेखील त्याची निष्ठा असते; तद्वत वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालूनच स्थायी कार्य उभे राहते. (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार त्यांची दृष्टी ही अशीच सम्यक होती. हिंदू समाजातील भेदाभेद हा समाज संघटनेतील सर्वांत मोठा अडसर होता. मात्र, तो दोष दूर करायचा तर त्यासाठी समाजात तसा वस्तुपाठ उभा करावा लागतो. तो उभा करायचा तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रयोगशाळा उभ्या कराव्या लागतात आणि तेथील प्रयोग यशस्वी करून दाखवावे लागतात. असे कार्य सामान्यत: झगमगाटात होत नाही; ते शांतपणे, संयमाने आणि तरीही सातत्याने करावे लागते. त्यासाठी स्वत:स त्यात गढून घ्यावे लागते. संघाचे आताचे जे विराट रूप दिसत आहे त्याचे रहस्य डॉ. हेडगेवार यांनी संघाला पायाभरणीतच दिलेल्या त्या बाळकडूत आहे, असेच म्हटले पाहिजे.
मुळात हिंदू समाजाचे संघटन हा विचारच मुळी विसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘क्रांतिकारक’ असाच होता. शिवाय त्यासाठी (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार यांनी स्थापित केलेली कार्यशैली ही देखील वरकरणी सहज वाटणारी पण खोलात जाऊन विचार केला तर अतिशय परिणामकारक ठरणारी होती. भगिनी निवेदिता यांनी प्रत्येकाने रोज देशासाठी काही वेळ द्यावा, अशी सूचना केली होती. संघाच्या शाखेची कल्पना त्यातून आलीही असेल. पण कार्यशैली ही ध्येयावर वरचढ ठरली तर संघटना चाकोरीबद्ध होते; तीत चैतन्य राहत नाही. डॉ. हेडगेवार यांनी तसे होऊ देणे कटाक्षाने टाळले. (RSS) हिंदू समाजातील दोषांवर प्रभावी उपाय म्हणून संघाची स्थापना करतानाच प्रत्येक नागरिक संघाशी निगडित असेल, असा अव्यवहारी स्वप्नाळूपणा त्यांनी कधी बाळगला नाही. शहरी आणि ग्रामीण भागातील अनुक्रमे 3 आणि 1 टक्का इतके नागरिक संघाचे असले, तरी समाजाचे परिवर्तन होऊ शकते, हा द्रष्टा विचार डॉ. हेडगेवार यांनी मांडला; याचे कारण समाजाला नेतृत्व लागते. ते विश्वासार्ह लागते; त्यागी लागते. मग समाज त्याचे अनुकरण करण्यास तयार असतो. मात्र मुळात असे नेतृत्व तयार करणे म्हणजे कारखान्यात साचेबद्ध वस्तुनिर्मिती करणे नव्हे. आवश्यक गुणवत्ता असणारे मनुष्यबळ तयार करणे हे दूरगामी काम आहे; त्यासाठी निरंतर चालणारी प्रक्रिया हवी, कार्यपद्धती हवी. संघ शाखा ही डॉ. हेडगेवार यांनी त्यासाठी दिलेली कार्यपद्धती. तथापि, केवळ त्यानेही भागत नाही. त्यासाठी मुळात हे समाज-नेतृत्व जेथे निर्माण करायचे तेथील नेतृत्व बावनकशी हवे. (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार हेच त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते.
शून्यातून संघटना त्यांनी उभी केली. हजारो स्वयंसेवक त्यांच्या हयातीतच उभे राहिले. त्यांच्यासमोर आदर्श होता तो डॉ. हेडगेवार यांचाच. संघ हा आपले उद्दिष्ट पूर्ण करेपर्यंत कार्यरत असायला हवा आणि त्यासाठी दीर्घकालीन कार्य उभे करण्याची निकड आहे, याची डॉ. हेडगेवार यांना जाणीव होती. त्यासाठी संघटना ही एखाद्या व्यक्तीची न होता ती विचारनिष्ठ राहावी म्हणून त्यांनी घालून दिलेले पायंडे हे संघाच्या (RSS) वाटचालीतील महत्त्वाचा घटक. शिवाय संघ उभारणीत त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या द्रष्टेपणाचेच परिचायक. (Dr. Hedgewar) डॉ. हेडगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची उत्सव म्हणून सुरुवात केली; विजयादशमीसारखे पराक्रमाची प्रेरणा देणारे उत्सव योजले, हे त्यांचे वेगळेपण. गुरू म्हणून व्यक्तीची निवड न करता भगव्या ध्वजाला गुरू मानणे हा अत्यंत क्रांतिकारक असाच निर्णय. स्वतः डॉक्टरांनी आपल्या रक्ताचे पाणी केले ते समाजाच्या संघटनेच्या भव्य उद्देशाने. ते करताना कार्यकर्त्यांनी आपल्या त्या त्यागाचे भांडवल करता कामा नये, अशी डॉक्टरांची धारणा असावी. एस. एम. जोशी यांच्या आत्मचरित्राविषयी लिहिताना पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते की, एसेम यांनी हे आत्मचरित्र इतक्या आत्मविलोपी वृत्तीने लिहिले आहे की, त्यात लढे दिसतात; पण लढवय्या दिसत नाही. संघालादेखील हे वर्णन चपखल लागू पडते.
डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांचे चरित्र लिहिताना नाना पालकरांना माहिती मिळविण्यासाठी किती पायपीट करावी लागली, हे डॉक्टरांच्या आणि (RSS) संघाच्या कार्यकर्त्याच्या आत्मविलोपी वृत्तीचेच द्योतक. त्यागाबरोबरच चारित्र्य हेदेखील महत्त्वाचे असते. कारण कशापेक्षाही अधिक प्रभाव नैतिकतेचा असतो. डॉक्टर हे चारित्र्यसंपन्नतेचे वस्तुपाठ होतेच. डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या प्रारंभिक काळातच या तिन्ही घटकांच्या बाबतीत असे वस्तुपाठ उभे केले की, गेली दहा दशके अनेक संकटे झेलूनदेखील संघाने आपला तो मूलभूत स्वभाव सोडलेला नाही. डॉक्टरांचे हे योगदान अनन्यसाधारण असेच आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या स्थापनेनंतरची पुढील 15 वर्षे संघटनेच्या वाढीसाठी इतकी मेहनत घेतली की, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. ध्येयवेडेपण यापेक्षा निराळे नसते. काही उद्दिष्ट्य ही नजीकच्या भविष्यकाळात गाठायची असतात तर काही दूरगामी असतात. स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट संघासमोरही होते. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघटित, ध्येयप्रेरित समाज हवा असेल तर ते दूरगामी उद्दिष्ट गाठण्याची सुरुवात समांतर करायला हवी, याची जाणीव डॉ. हेडगेवार यांना होती.
संघाची (RSS) स्थापना त्याच जाणिवेतून त्यांनी केली. आत्मविश्वास असलेला, अनुशासन असलेला चारित्र्यसंपन्न समाज निर्माण करायचा तर त्यासाठी नेतृत्वनिर्मिती करणारी संघटना हवी; पण अंतिमतः ते समाजातील संघटन नसून ते समाजाचेच संघटन असावे, या द्रष्ट्या भूमिकेतून डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांनी संघाची स्थापना केली. त्यासाठी प्रशिक्षण वर्गांची, उत्सव-कार्यक‘मांची, दैनंदिन शाखांची, प्रचारक व्यवस्थेची योजना केली. पण या कार्यपद्धतीच्या पलीकडे जाणारा एक मंत्र डॉ. हेडगेवार यांनी दिला. त्यामुळेच संघाने अगदी आपल्या प्रार्थनेपासून गणवेशापर्यंत कालानुरूप बदल केले. मात्र, समाज संघटनेच्या मंत्रात मात्र कदापि बदल केलेला नाही. तंत्रापेक्षा मंत्र प्रेरणादायी असतो. त्या प्रेरणेतून गेले शतकभर संघाने आपला विस्तार करतानाच समाजाला संघटित केले, समाजाचे जागरण केले. प्रबोधन केले, समाजाला कार्यप्रवृत्त केले; हिंदुत्वाबद्दलची जागृती समाजात निर्माण करण्याचे मोठे श्रेय संघाला जाते. याची भक्कम पायाभरणी डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांनी केली. अर्थात ते मोठेपण समजण्यासाठीदेखील एक पात्रता लागते. संघावर टीका करणार्यांनी संघाला धुमारे का फुटत राहिले आणि त्याच सुमारास अथवा नंतर स्थापन झालेल्या अन्य संघटना निष्प्रभ का झाल्या, याचा शोध पूर्वग‘हविरहित दृष्टीने घ्यायला हवा. पु. भा. भावे यांनी म्हटले होते तसे त्याग, निष्ठा, मोठेपण समजण्यासाठीदेखील एक पात्रता लागते. ती नसली की, प्रत्येक मोठी गोष्ट खोटी आणि प्रत्येक अपरिचित सत्य हे सर्वांत मोठे असत्य वाटायला लागते. डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांचे मूल्यमापन विद्वेषी पद्धतीने करणार्यांनादेखील हे तत्त्व लागू होतेच!
– 9822828819