अन्नाची नासाडी; एक भयावह वास्तव !

जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म … उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म

तरुण भारत : चंगळवादाशी आम्ही नात जोडल्यामुळे समर्थ रामदास स्वामींचा हा मंत्र आम्ही विसरलो. त्यामुळे उदर भरणाèया यज्ञकर्माचं नातं तुटल्याने अन्नाला आज दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. शरीराचे पोषण करणा-या अन्नाला अन्नदेवतेचा दर्जा कायम ठेवला असता तर, कदाचित आज भारतासह जगभरात होणारी अन्नाची नासाडी निदान आम्ही भारतीय तरी फोफवू शकलो असतो. अन भुकेल्यांच्या पोटात दोन घास तरी गेले असते. जगभरातील धान्य उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाची आठवण झाली. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. तो एक यज्ञकर्मही आहे. परंतु, काळाच्या ओघात आम्ही हे सर्व विसरून निव्वळ उदरभरणाला महत्त्व दिल्यामुळे, संस्काराअभावी ताटामधील अन्नाची किंमत कमी झाली व अन्नाची नासाडी वाढली.

जगभरातील विचारवंत याबाबत चिंता व्यक्त करीत असले, तरी भारतीयांचे अजूनही डोळे उघडले नाहीत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ साली जगामध्ये ८२.८ कोटी लोकांवर उपासमारीची पाळी आली होती. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे जगातील धान्य उत्पादनात घट होत आहे. त्याचा गंभीर परिणाम दृष्टिपथात येत असूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याने भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात अन्नाची होणारी नासाडी व त्याचे व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या बनली आहे. लग्न समारंभ, हॉटेल, सामाजिक व कौटुंबिक समारंभामध्ये अन्न फार मोठ्या प्रमाणात वाया जाते. आपल्या देशात दररोज जवळपास ४० टक्के अन्न वाया जाते. दररोज फेकल्या जाणारे हे साडेसात टन अन्न किती लोकांचे पोट भरू शकते, याचा आम्ही कधीच विचार करीत नाही. हा घातक चंगळवाद देशाला वाळवीसारखा पोखरत आहे. एकीकडे लाखो लोकांना एकवेळचे जेवणही मिळत नाही, अशी भीषण परिस्थिती आहे.

भारतामध्ये दरवर्षी एक व्यक्ती सरासरी ५० किलो अन्न वाया घालवत असल्याचे अभ्यासामध्ये समोर आले आहे. सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या एका अभ्यासामध्ये जगभरात जवळपास ९३१ दशलक्ष टन अन्नाची नासाडी झाल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्राने काढला आहे. जगभरातील एकूण अन्न उत्पादनापैकी १७ टक्के अन्न वाया गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक घरामध्ये वाया जाणा-या खाद्यपदार्थाचे प्रमाण प्रती व्यक्ती ५९ कि. ग्रॅ. असून चीनमध्ये हेच प्रमाण प्रती व्यक्ती ६४ कि. ग्रॅ. एवढे आहे. जगभरात हा सरासरी आकडा प्रती व्यक्ती १२१ कि. ग्रॅ. अन्न दरवर्षी वाया जात असून त्यापैकी ७४ कि. ग्रॅ. अन्न घरामधून वाया जात असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. अन्नाची जगभरात होणारी नासाडी हा एक गंभीर सामाजिक प्रश्न असून भारतासाठीही हा एक ज्वलंत व चिंतेचा विषय आहे. अन्नाअभावी जगामध्ये दररोज एक अब्ज माणसे रात्री उपाशीपोटी झोपतात. परंतुु, समाजाला त्याचे काहीच देणे-घेणे नाही. प्रगत युरोपीय देशामध्ये तर अन्नाप्रती असलेली अनास्था हा फार कळीचा मुद्दा आहे. ‘वापरा आणि फेका’ हेच त्यांचे जगण्याचे तत्त्व असल्याने अन्नाला गौण समजून ते सरळ उकिरड्यावर फेकले जाते.

त्यांना ना अन्न निर्मितीसाठी केलेल्या श्रमाची जाण, ना पर्यावरणाची चिंता व नको असलेल्या अन्नाचा योग्य विनियोग करण्याचा विवेक. आपला भारत देशही त्यामध्ये मागे नसून अन्न पदार्थाच्या नासाडीत आपण जगात दुसऱ्या या क्रमांकावर आहोत. भारतामध्ये फक्त वाया जाणाèया गव्हाचाच विचार केला तर ऑस्ट्रेलियात उत्पादित होणा-या गव्हाएवढे हे प्रमाण आहे. त्यामुळे अन्नाची होणारी नासाडी म्हणजे केवळ अन्नच वाया जातं असं नाही; त्यामध्ये पैसा, पाणी, ऊर्जा, जमीन व श्रमाचीही हानी होते. फेकलेले अन्न हे हवामान बदलांसाठी कारणीभूत ठरत असतं. सडलेल्या अन्नातून निघणारा मिथेन वायू पर्यावरणाला दूषित करीत असतो. त्यामुळे फेकलेले अन्न सामाजिक व पर्यावरणविषयक गंभीर समस्या निर्माण करतात, हे आम्ही कधी समजुून घेणार आहोत. काही वर्षांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गंभीर समस्येबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी नागरिकांना याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. जगभरात अन्नाविना दररोज २५ हजार लोक मृत्युमुखी पडतात. निदान अशा भीषण आणि गंभीर परिस्थितीचे भयावह वास्तव नजरेसमोर ठेऊन आपण तरी अन्नाची होणारी नासाडी थांबवू या. यातच आपले अन् जगाचेही भले आहे.

 चंद्रकांत लोहाणा 

९८८१७१७८५६