यावल : एका तरुणाचे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दगडी मनवेल येथे मंगळवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश विक्रम कोळी (वय ४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. सोमवार, १ जुलै रोजी रात्री जेवण करुन स्वतःच्या घरी झोपला होता. मंगळवारी सकाळी त्याला कुटुंबीय उठविण्याकरीता गेले असता राहत्या घरात त्याने छताच्या आसारीला दोरीने बांधून गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याला तातडीने एका वाहनातून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील जीवन जयसिंग कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.