इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक प्रवासी रेल्वे हायजॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान मधील बलुच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली . अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर हल्ला करत बीलएने जाफर एक्सप्रेस थांबवून बीलएच्या सैनिकांकडून ६ पाकिस्तानी सैनिकांची हत्या करण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ डब्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशांसह जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी फुटीरतावादी गटाने हा हल्ला केला आहे. एका निवेदनातून बीएलएने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ट्रेनमधील ४००हून अधिक प्रवाश्यांना ओलीस ठेवल्याचा दावाही केला आहे. पाकिस्तानी प्रवाशांच्या ट्रेनचं अपहरण केल्यानंतर बीएलएने इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने कुठलेही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास रेल्वेमधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बलूच लिबरेशन आर्मीच्या निवेदनानुसार, त्यांनी १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे कर्मचारी आहेत. “ओलीस ठेवलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवादविरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर असून सुटीसाठी ते पंजाबला निघाले होते.” तसेच या कारवाईदरम्यान, बलूच लिबरेशन आर्मीने महिला, मुले आणि बलूच प्रवाशांना सोडल्याचेही निवेदनात म्हटले आहे.