धडगाव : धडगाव ते नाशिक (दत्तनगर) आणि मोलगी ते दत्तनगर नाशिक बससेवा सुरू करण्याची मागणी सातपुडा परिवर्तन परिवारतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शहादा, अक्कलकुवा आणि नाशिक येथील एस. टी. विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शहादा आगारात सहाय्यक आगार प्रमुख राकेश पवार यांना प्रा. डॉ. खुमानसिंग वळवी व प्रा. मधुकर ठाकरे यांनी तर अक्कलकुवा आगारात सहायक आगार प्रमुख रविंद्र मोरे यांना डॉ. राजेश्वरसिंग पाडवी यांनी निवेदन सादर केले. या मागणीस अक्कलकुवा आगार प्रमुख रविंद्र मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करण्याच्या विनंतीला मान्यता दिली.
विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारांसाठी जीवनावश्यक सेवा
धडगाव आणि मोलगी परिसर हा आदिवासीबहुल भाग असून, येथील विद्यार्थ्यांना नाशिकसारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. बससेवा सुरू झाल्यास त्यांना शिक्षणासाठी नियमित प्रवास करणे सुलभ होईल. याशिवाय, नाशिकमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने या भागातील तरुणांसाठी हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीनेही ही बससेवा महत्त्वाची आहे. नाशिकमध्ये अनेक आधुनिक रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे या भागातील रुग्णांना वेळेत उपचार घेता येतील. सध्या या भागातील नागरिकांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडतो.
नागरिकांना प्रवासात मोठी गैरसोय
धडगाव-नाशिक हे अंतर सुमारे 315 किलोमीटर असून, मोलगी-नाशिक 310 किलोमीटर आहे. सध्या या मार्गावर थेट बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना आधी धडगाव किंवा मोलगी गाठावे लागते आणि त्यानंतर खाजगी वाहनाने 70-80 किलोमीटर अंतर कापून शहादा किंवा अक्कलकुवा गाठावे लागते. त्यानंतरच नाशिकसाठी पुढील प्रवास करता येतो. लहान मुले, आजारी व्यक्ती आणि महिलांसाठी हा प्रवास अत्यंत कष्टदायक आहे. त्यामुळे सातपुडा परिवर्तन परिवाराने ही बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
चारशेहून अधिक नागरिकांची स्वाक्षरी
सातपुडा परिवर्तन परिवाराचे प्रा. खुमानसिंग वळवी, प्रा. मधुकर ठाकरे, प्रा. राकेश वळवी, प्रा. शांताराम वळवी, प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, धीरसिंग वळवी यांच्यासह नाशिकमध्ये शिक्षण व नोकरीसाठी असलेल्या 400 हून अधिक नागरिकांनी या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.