अपघातांची मालिका सुरू असताना ब्लॅकस्पॉट नाही

तरुणभारत लाइव्ह जळगाव  शहरानजिक शिरसोली- रामदेववाडीजवळ शनिवारी दुपारी दुचाकी आणि टँकरच्या धडकेत एका जणाचा मृत्यू तर एक मुलगी जखमी झाली, तर रविवारीदेखील चाळीसगाव येथील रेल्वे पुलाजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा चेंंदामेंदा झाला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नवनर्षदिनी  लागोपाठ दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच चारपाच दिवसांपूर्वीच पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ टॅकरने धडक दिल्यामुळे चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 दरम्यान 465 अपघात झाले. त्यात 150 पेक्षा अधिक जणांचा जागीच तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट नाहीत आणि होते ते काढण्यात आले असल्याचे संबंधितविभागांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी ब्लॅक स्पॉट शोधण्यात आलेले आहेत. त्यानुसार या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणूनच्या उपाययोजना करणेदेखील अपेक्षित आहे. त्यानुषंगाने पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि उपप्रादेशिक परिवहन यांच्यातर्फे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. असे असले तरी कागदोपत्री असलेले ब्लॅक स्पॉट हटविण्याचे काम करण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याने महामार्गासह अन्य ठिकाणी दररोज होणार्‍या अपघातांच्या संदर्भात रस्ता सुरक्षा समितीसह अन्य संबंधित यंत्रणा मात्र बेफिकीर आहे. त्यामुळेच कि काय? अपघाताची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढत असल्याचेच चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट नाहीत, सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांचीही संख्या भरमसाट वाढत आहे. दररोज किमान 2 ते 5 वाहने आणि सण उत्सव वा ऑफर काळात शेकडोंच्या संख्येने नवनवीन वाहनांची भर पडत आहे. दुचाकी तसेच चारचाकी लहान मोठ्या वाहनांच्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अपघात झाले. त्यामध्ये अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर जण जखमी झाले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता शहरात तसेच जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट किंवा अपघात स्थळे नाहीतच? असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचे स्वीय सहायक आणि संबंधित यंत्रणेने माहिती दिली.
3 होते ते दुरूस्त झालेत

अपघाताच्या अनुषंगाने आरटीओ, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रणव क्षेत्र किंवा अपघात स्थळांची) निश्चिती केले जाते. ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात, तो परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जातो. जिल्ह्यात शहर व परिसरात खोटेनगर परिसरातील 1 ब्लॅक स्पॉट निश्चित होता. खोटनगर जवळील आणि चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचगव्हाण फाट्याजवळ तसेच अन्य ठिकाणी एक असे तीन ब्लॅक स्पॉट होते ते रस्ते चौपदरीकरणांतर्गत काढण्यात आले असल्याची माहीती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली.

महामार्गांसह अन्य ठिकाणी चिन्ह मार्गदर्शक सुचनांचा अभाव

जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य राज्य मार्गांवर दिशादर्शक, वेग मर्यादा वा गाव, शाळा, रुग्णालय, अत्यावश्यक सेवा तसेच रस्ता ओलांडण्यासाठी असलेले झेब्रा क्रॉसिंग किंवा रस्त्याच्या कडेला लाल पिवळया पांढर्‍या रंगाच्या रेडीयम प्लेटच नाहीत. काही ठिकाणी पांंढरे पट्टे आहेत. परंतु ते दिसेनासे झाले आहेत.

अपघातस्थळ, अपघात प्रवण क्षेत्र उपाययोजना राबविणे आवश्यक

महामार्ग वा राज्यमार्गांवर असलेल्या रस्त्यांवरील तीव्र वळण कमी करणे अथवा सरळ करणे, दिशादर्शक फलक, कॅट आय लावणे, पांढरा वा पिवळा पट्टा साईड मार्किंग करणे, वळण मार्किंग, ब्लॅक स्पॉट निश्चिती, ब्लॅक स्पॉटची यादी रस्ते सुरक्षा समितीला देणे, मंजुरीनंतर निधीसाठी शासनाकडे पाठविणे, त्यावर उपाययोजना अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

शहर महानगर पालिकेची तर तर्‍हाच वेगळी आहे. त्यांच्याकडे एकतर रस्ते दुरूस्तीसाठी निधीच मिळत नाही, आणि असला तरी तो लोकप्रतिनिधींच्या श्रेयवाद आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खर्च न झाल्याने रस्ते आहे त्यापेक्षा अधिक दुरावस्थेत गेल्याचे दिसून येत आहेत. नाही म्हणायला ओरड झाल्यांनतर विनाडांबरचे सुद्धा रस्ते तयार करण्यात आले आहेत.

अपघाताची अन्य कारणे

दुचाकी वा चारचाकी वाहन चालकाकडून बेफाम, बेदरकार ड्रायव्हिंग, मद्यप्राशन करून वाहने चालविणे, वाहनाची अवस्था, दुरूस्ती वा बिघाड झालेली स्थिती, ओव्हरलोड वाहने, अनफिटनेस वाहने, रस्त्याची परिस्थिती, धोकादायक वळणांवर सावधपणे वाहन न हाकता बेसावध बेजबाबदारपणे वाहन चालविणे आदी कारणे आहेत.

कागदोपत्री 465 तर लहान किरकोळ अपघातांचे काय?

अपघातांच्या आकडेवारीत राज्यात औरंगाबाद, नाशिक तसेच धुळे पाठोपाठ जळगाव शहराचा क्रम आहे. गेल्या वर्षभरात पोलीस नोंदीनुसार 465 अपघात झाले असून किरकोळ अपघातांची तर नोंदच नसते. यात दोन दुचाकींची वा अन्य वाहनांची समोरासमोर धडकल्याने वा अन्य कारणामुळे नुकसान होते. परंतु पोलिसी झंझट नको म्हणून बरेचसे नागरिक पोलीस ठाण्याची पायरी कोणी चढत नाहीत व वाहनचालकांच्या आपापसातील समझोत्यामुळे या नोंदी होत नाहीत. त्यामुळे दररोज होत असलेल्या अपघातांची संख्या पाहता तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

ब्लॅक स्पॉटची निश्चिती

रस्ते तसेच महामार्गावर 500 मीटर भागात मागील तीन वर्षांत चार ते पाच अपघात झाले, त्याचप्रमाणे पाच वर्षांत दहा व्यक्तींचे मृत्यू झाले, अशी अपघाग्रस्त ठिकाणांचे वर्गीकरण ब्लॅक स्पॉट म्हणून केले जाते. अशी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार परिवहन, बांधकाम, शहर वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संयुक्त पहाणी करून अपघातग्रस्तस्थळांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

रस्ते सुरक्षा समिती नावालाच

वाहनांच्या अपघाताच्या अनुषंगाने उपाययोजनांतर्गत रस्ते अपघात विश्लेषण समित्या नियुक्त आहेत. या समितीने प्रत्येक अपघातस्थळी भेट देऊन आणि अपघाताच्या शक्यता असलेली ठिकाणे पहाता यासंदर्भात विश्लेषण करून अहवाल देणे अपेक्षित आहे. याशिवाय खासदार तसेच जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेली जिल्हा रस्ते सुरक्षा समिती कार्यरत आहे. या समितीने प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन अपघातांचा आढावा तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेणे हे रस्ता सुरक्षा समितीचे काम आहे. मात्र रस्ता सुरक्षा समितीची बैठक नियमित बोलावली गेलेली नाही.