हिंदूंच्या आस्थेसोबत तडजोड नाहीच, योगी आदित्यनाथ यांचे आदेश

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांना त्यांचे नाव लावण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात हिंदूंच्या आस्थेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही, याची पुन्हा एकदा ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कावड यात्रेकरूंसह हिंदूंची धार्मिक आस्था जपण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ‘नामफलक’ लावणे बंधनकारक केले आहे.

त्याचप्रमाणे हलाल प्रमाणपत्रांसह उत्पादने विकल्यास, त्याविरोधातदेखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रथम हा निर्णय केवळ सहारनपूर जिल्ह्यापुरताच मर्यादित होता. मात्र, राज्यातील हिंदू भाविकांच्या भावनांचा आदर ठेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरातील कावड यात्रा मार्गांसाठी हा निर्णय लागू केला आहे. याअंतर्गत हॉटेल मालकाचे नाव स्पष्ट शब्दात लिहावे लागणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस आणि सपासह अनेक राजकीय पक्षांनी टिका केली आहे. मात्र, त्या टिकेकजे लक्ष न देता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला निर्णय कायम ठेवला आहे. लवकरच हिंदूंसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यास प्रारंभ होणार आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरेतील हिंदूंच्या आस्थेची कावड यात्राही सुरू होते. यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने उत्तराखंडमधील हरिद्वार येथून हिंदू भाविक पवित्र गंगा नदीचे जल घेऊन पायी चालत आपापल्या गावी अथवा तीर्थस्थळापर्यंतचा प्रवास करतात.

यावेळी हरिद्वारपासून आपल्या खांद्यावर गंगाजलाने भरलेली कावड घेऊन पायी चालत जाणाऱ्या कावड यात्रेकरूंचे उत्तर प्रदेशात मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार कावड यात्रेकरूंवर सरकारी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षावही करण्यात येतो.

ओळख लपविण्यामागे हेतू काय ? राकेश त्रिपाठी, उत्तर प्रदेश भाजप प्रवक्ते
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेच्या मार्गावरील सर्वच खाद्यपदार्थांच्या दुकानांना आपले नाव ठळकपणे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट धर्माविरोधात हा निर्णय असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची नावे हिंदू देवी-देवतांच्या नावावर, हिंदू धार्मिक प्रतिकांच्या नावावर ठेवली होती.

मात्र, प्रत्यक्षात त्यांचा धर्म आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत काहीतरी वेगळीच असते; अशा अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. अशा प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे पवित्र श्रावणातील कावड यात्रेच्या मार्गावर हा नियम लागू करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे खरी ओळख सार्वजनिक करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी ते खरी ओळख लपवू का इच्छितात, हे स्पष्ट करावे