जळगाव: रविवारी पोलीस शिपाई भरतीची होणार लेखी परीक्षा

एम. जे. कॉलेजमध्ये सकाळी आठ वाजता हजर होणे आवश्यक.

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस
दलात विविध संवर्गातील १३७ जागांच्या पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र उमेदवारांची रविवार, ७ रोजी सकाळी नऊ वाजता एम. जे. कॉलेज येथे लेखी परीक्षा होत आहे. उमेदवारांनी सकाळी आठ वाजता परीक्षा केंद्रावर हजर होणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक कार्यालयातून सूचित करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा पोलीस घटकात एकूण १३७ पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा पात्र उमेदवारांची यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसंदर्भात कळविण्यात आलेले आहे.

लेखी परीक्षेसाठी लेखन साहित्य परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मोबाइल तथा कोणतेही इलेक्ट्रॉनिक (डिवाईस) व इतर साहित्य सोबत आणू नये.

उमेदवारांनी फक्त महाआयटीकडील लेखी परीक्षा प्रवेश पत्रासह, स्वतःचे आधार कार्ड व जळगाव पोलीस घटकाचे ओळखपत्र सोबत आणावयाचे आहे, असे पोलीस अधीक्षक जळगाव यांनी निवेदनातून सूचित केले आहे.

जिल्हा पोलीस दलाच्या १३७ पोलीस शिपाई भरतीसाठी ६,५५७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या दिवशी ५००, त्यानंतर प्रती दिवस एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्याचे नियोजन पोलीस दलातर्फे करण्यात

आले होते. भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक एक, अपर पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी पाच, पोलीस निरीक्षक दहा, पोलीस उपनिरीक्षक १५ तसेच पोलीस कर्मचारी ३५० असे मनुष्यबळ कार्यतत्पर करण्यात आले होते.

दीड तासाची लेखी परीक्षा
ही लेखी परीक्षा रविवार, ७ जुलै रोजी सकाळी ९ ते १०.३० वाजेदरम्यान शहरातील मूळजी जेठा महाविद्यालय (एम.जे. कॉलेज), प्रभात चौफुलीजवळ, जळगाव येथे होत आहे. पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना रविवारी सकाळी आठ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.