तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीदरम्यान मागीलवर्षी सुरू झाला. आता समृद्धी महामार्गावर लवकरच या ठिकाणी विशेष सुविधा उभ्या राहणार आहेत. त्यासाठी जमीनमालकांकडून जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर कोणत्या विशेष सुविधा उभ्या रहाणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीदरम्यान गेल्यावर्षी सुरू झाला असून, सध्या तिथे महामार्गासाठी आवश्यक पुरेशा सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. पेट्रोल पंप, हॉटेल्स, स्वछतागृह या कोणत्याच सुविधा आता तिथे नसून महामार्गावर प्रवास करणे वाहनचालकांसाठी तसे जिकीरीचे ठरते. पण लवकरच या ठिकाणी या महामार्गावर सुविधा उभारणीसाठी रस्ते विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्याअसून यासाठी महामंडळाने ‘लँड पुलिंग’ योजनेचा अवलंब केला आहे.
एका बाजूने आठ म्हणजेच एकूण १६ ठिकाणी या सुविधा असणार आहेत. प्रत्येक ठिकाणासाठी किमान ५० कोटी रुपयांचा खर्च संबंधित विकासक व कंत्राटदाराला करायचा आहे. त्या जमिनीवरदेखील ५० कोटी रुपये खर्चून विकासकांना सुविधांची उभारणी करायची आहे. २० फेब्रुवारी ही त्यासंबंधीच्या निविदेची शेवटची तारीख आहे. अशाप्रकारे समृद्धी महामार्गावरील सुविधेपोटी किमान १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य रस्ते विकास महामंडळ पुढील पाच वर्षांत करणार आहे.