पंतप्रधान मोदींनी देशवासीयांसोबत ‘मन की बात मध्ये ‘; ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून दि. ३० जून २०२३, रविवारी देशवासीयांना संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत विक्रमी तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला मन की बात कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करत असतात. त्यासोबतचं ते देशवासीयांना विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करत असतात.

या कार्यक्रमात सुद्धा पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी सर्व देशवासीयांना, जगातील सर्व देशांतील लोकांना त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण मोहीम झपाट्याने सुरू आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाद्वारे भारतातील विविध भागातील संस्कृती, उत्पादनांची ओळख देशातील जनतेला करून देत असतात. यावेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना केरळच्या वैशिष्ट्यपूर्ण छत्र्यांची ओळख करून दिली. पंतप्रधान म्हणाले की, मान्सूनच्या आगमनाबरोबरच आपल्याला छत्र्यांची आठवण होते, परंतु केरळमध्ये विविध प्रकारच्या छत्र्या बनवल्या जातात हे क्वचितच कोणाला माहीत असेल. अशा सुंदर छत्र्या बनवणं ही तिथल्या आदिवासी महिलांची मेहनत असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “खरं तर केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचं विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि विधींचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या ‘कार्थुंबी छत्री’ आहेत आणि त्या केरळच्या अट्टप्पाडीमध्ये बनवल्या जातात.”