---Advertisement---
Brain Stroke Symptoms : भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्ट्रोक हे जगभरातील मृत्यूचं दुसरं मोठं कारण आहे. ब्रेन स्ट्रोक ही अचानक आरोग्यावर येणारी गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूला होणार रक्तपुरवठा थांबतो ज्येमुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होते. वेळेवर उपचार न केल्यास रुग्णाला लकवा, बोलणे आणि समजणे या समस्या जाणवतात. अनेकदा लोक सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि जीवही गमावतात. तर अश्या समस्या दिसताच वेळेवर वैद्यकीय मदत घेतल्यास, स्ट्रोकचे घातक परिणाम टाळता येतात.
ब्रेन स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे
स्मितहास्य बिघडणे : बऱ्याचदा सुरुवातीला रुग्णाला चेहऱ्याची एक बाजू वाकडी झाल्यासारखे किंवा हास्य बिघडल्यासारखे वाटते.
हात आणि पायांमध्ये अचानक कमजोरी : यासोबतच, हात आणि पायांमध्ये, विशेषतः शरीराच्या एका बाजूला अचानक कमजोरी किंवा बधीरपणा येऊ शकतो.
स्पष्टपणे बोलण्यात अडचण : बऱ्याचदा रुग्णाला स्पष्टपणे बोलण्यास त्रास होतो, शब्द गोंधळतात किंवा इतर काय बोलतात ते समजण्यास अडचण येते.
अचानक अस्पष्ट दृष्टी : काही प्रकरणांमध्ये, अचानक अस्पष्ट दृष्टी, एका डोळ्यातून दृष्टी कमी होणे किंवा दुहेरी दृष्टी येणे हे देखील स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
वारंवार चक्कर येणे : संतुलन बिघडणे, वारंवार चक्कर येणे आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी ही देखील या गंभीर समस्येची चेतावणी देणारी लक्षणे आहेत.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखावी?
ही लक्षणे समजून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे F.A.S.T सूत्र: F (चेहरा) – चेहऱ्याचा वाकडापणा पहा, A (हात) – दोन्ही हात वर केल्यावर एक हात खाली पडला तर, S (भाषण) – अस्पष्ट बोलणे किंवा तोतरेपणा येत असल्यास आणि T (वेळ) – ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. लक्षात ठेवा, स्ट्रोक झाल्यास वेळ हा जीवन आहे. रुग्ण जितक्या लवकर रुग्णालयात पोहोचेल आणि उपचार सुरू करेल तितकेच त्याचे गंभीर दुष्परिणाम टाळता येतील. म्हणून, ही लक्षणे कधीही हलक्यात घेऊ नका आणि ताबडतोब तज्ञांची मदत घ्या.
कोणती खबरदारी घ्यावी?
ब्रेन स्ट्रोक मध्ये प्रत्येक मिनिटाला, मेंदूच्या लाखो पेशी खराब होतात, म्हणून उपचारात हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो. रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्वाचे आहे, कारण ही स्ट्रोकची प्रमुख कारणे आहेत. धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप मेंदू निरोगी ठेवते. कोलेस्टेरॉल आणि हृदय तपासणी नियमितपणे करावी. ताण कमी करणे आणि योग आणि ध्यानधारणा करणे देखील फायदेशीर आहे.
बऱ्याचदा लोक हलकी डोकेदुखी, थोडीशी चक्कर येणे किंवा अशक्तपणा क्षुल्लक मानतात, तर कधीकधी हे मोठे धोक्याचे संकेत असू शकतात. विशेषतः ज्यांच्या कुटुंबात हृदयरोग किंवा स्ट्रोकचा इतिहास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. लक्षात ठेवा “स्ट्रोक झाल्यास वेळ हा जीवन आहे.” जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितकेच रुग्ण गंभीर नुकसान न होता बरा होण्याची शक्यता जास्त असते.
Disclaimer : (या लेखात दिलेल्या टिप्स फक्त सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. आरोग्याशी संबंधित कोणताही उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरुण भारत लाईव्ह कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.)