---Advertisement---
लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतात. मात्र जोडीदाराची निवड किंवा परस्पर समज कमी पडली, तर नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. अनेकदा गंभीर कारणांमुळे घटस्फोट होतो, पण काही प्रकरणांमध्ये अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या कारणांवरूनही पती-पत्नी वेगळे झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अशीच काही धक्कादायक प्रकरणे पुढे आली आहेत.
स्ट्रॉबेरीमुळेही संसार तुटू शकतो, यावर विश्वास बसणार नाही, पण सोशल मीडियावर समोर आलेली ही घटना अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली. रेडिटवरील एका युजरने सांगितले की, त्याच्या आजीने आजोबांना घटस्फोट दिला. कारण एवढेच होते की, आजीने प्रेमाने वाढवलेल्या स्ट्रॉबेरीच्या झाडावरील फळ आजोबांनी परवानगी न घेता तोडून खाल्ले.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातून घटस्फोटाचे आणखी एक वेगळे कारण समोर आले. एका पुरुषाने न्यायालयात अर्ज करत सांगितले की, त्याची पत्नी रोज त्याला फक्त इन्स्टंट नूडल्सच बनवून देते. शिवाय ती नूडल्सही नीट शिजवत नाही, असा त्याचा दावा होता. सतत नूडल्स खावे लागल्याने मानसिक त्रास होत असल्याचे कारण देत त्याने घटस्फोटाची मागणी केली. अखेर कायदेशीर प्रक्रियेनंतर दोघे वेगळे झाले.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका महिलेने दिलेले कारण तर अधिकच धक्कादायक होते. लग्नाच्या अवघ्या 18 महिन्यांत तिने घटस्फोटाची मागणी केली. तिच्या म्हणण्यानुसार, पती तिच्यावर खूप प्रेम करतो, कधीच भांडत नाही आणि तिच्या चुका नेहमी माफ करतो. सततच्या शांत आणि समजूतदार वागणुकीमुळे तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. पतीने आपल्याशी वाद घालावा, अशी तिची अपेक्षा होती, पण तसे होत नसल्यामुळे तिने घटस्फोट मागितला. मात्र शरिया न्यायालयातील धर्मगुरूंनी हे कारण मान्य केले नाही.
चीनमधील हेनान प्रांतातील शांगकीउ शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय ली या महिलेचा 16 वर्षांचा संसार केवळ केस गळतीमुळे संपुष्टात आला. तिच्या पतीने घटस्फोट देण्यामागचे कारण म्हणजे तिचे वाढते टक्कल. केस गळाल्यामुळे डोक्यावरील त्वचारोगाचे डाग दिसू लागले आणि याच कारणामुळे पतीने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संबंधित महिलेने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
इटलीतून आलेले प्रकरणही चर्चेचा विषय ठरले. ब्युटीशियन मारियाना हिने लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कारण असे की, हनिमूनसाठी गेलेल्या प्रवासात तिच्या पतीने आपल्या आईलाही सोबत नेले होते. जरी आईसाठी वेगळी खोली बुक केली असली, तरी हनिमूनमध्ये तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती मारियानाला मान्य नव्हती. याच कारणावरून तिने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.









