‘त्यांचे’ समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार ? : ना.गिरीश महाजन

पुणे : मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषण आंदोलन केले. मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने सर्व काही केले आहे. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही’.  जरांगेंचं समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार असा सवाल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ना. गिरीश महाजन यांनी मराठा समाज आरक्षणासंदर्भांत  50 वर्षात कोणी प्रयत्न केला का? असा प्रश्न उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज काय, असं शरद पवार म्हणाले होते याची आठवण करुन देत तेच आता आमच्यावर टीका करत आहेत, असे महाजन म्हणाले. आम्ही मराठ्यांच्या बाजूने आहोत. ओबीसींना धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. यात मनोज जरांगे पाटलाचं समाधान होत नसले तर आम्ही काय करणार. न्यायालयात सगे-सोयरे यांना दिलेलं आरक्षण टिकणार नाही. माझ्याकडील माहितीनुसार अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही. परंतु, यात काही करता आलं, तर सरकार प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात टीका केली आहे. यावर ना. महाजन म्हणाले, त्यांचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आंदोलनं कसं निर्माण झालं? यांची सुप्रिया सुळे यांनाही चांगली माहिती आहे. मला सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगायचं आहे की, त्यांनी दोन समुदायांमध्ये द्वेष, तेढ निर्माण होईल, अशी विधानं करू नयेत, असा सल्ला महाजन यांनी सुळेंना दिला आहे.