तरुण भारत लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । चोरीच्या सत्रात दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहेत. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात पाइपलाइनसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून व हात उसनवारी आणलेले १ लाखा ७० हजार रुपये अज्ञात चोरट्याने डल्ला मारत लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरबारसिंग झगेसिंग गिरासे रा.बोळे ता.पारोळा, जळगाव. यांनी पोलिसांत फिर्याद दिली. गिरासे यांना शेतामध्ये पाइपलाइन करायची होती, त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून एक लाख रुपये रोख उसनवार घेतले होते व आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून सत्तर हजार रुपये मिळाले होते. सदर रक्कम त्यांनी आपल्या घरातील गोदरेज कपाटामध्ये ठेवली होती.
दरम्यान, दि. १० रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी घराच्या बाहेर धुणे धुत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घरात घुसून व घरातील कपाटातील ठेवलेली एक लाख सत्तर हजार रुपये रक्कम लंपास केले.
याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जयवंत पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान, भरदिवसा दुपारच्या सुमारास घरात लोक असताना देखील अशा प्रकारच्या चोरी होत असल्याने ग्रामीण भागातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.