---Advertisement---
बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी मंदिर, शाळा, महाविद्यालयातही धुडगूस घातला आहे. शहरातील गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी एन्ट्री केली. मुद्देमालाचा शोध घेताना तीन ते चार कॅबीनची तोडफोड केली. फाईल, कागदपत्रे कपाटातून काढून फेकून दिली. दरवाजे तोडले. विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची एक लाख रुपयांची रोकड आणि ५ हजार रूपये किंमतीचा एनव्हीआर घेऊन चोरटे पसार झाले.
ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) मध्यरात्रीनंतर घडली. महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅम `यात तीन संशयित कैद झाले, मात्र पाच ते सहा जणांची ही टोळी होती, असे सांगण्यात आले. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी मयूर हेमराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कॉलेजचे कामकाज संपल्यानंतर सर्व विभाग नेहमीप्रमाणे बंद केले. मुख्य गेटला कुलूप लावले होते.
संध्याकाळी सहा वाजता दिवसपाळीचे सुरक्षा रक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक दीपक अनिल पाटील यांच्याकडे पदभार सोपविला होता. मध्यरात्री चोरट्यांनी कॉलेजचे मुख्य गेटचे कुलूप उघडून एंट्री केली. शनिवारी (१९ जुलै) सकाळी आठ वाजता कॉलेजचे लेखापाल मयूर सोपान माळी यांनी प्रशासकीय अधिकारी मयूर पाटील यांना फोन करून, कॉलेजचे मुख्य गेट खरचटलेले आणि मागे-पुढे झालेले असल्याची माहिती दिली.
कनिष्ठ लिपिक कुंदन इंगळे यांनी सर्वप्रथम कार्यालयात प्रवेश केल्यावर अकाउंट विभागातील कपाटे आणि फाईल्स अस्ताव्यस्त पडलेल्या पाहिल्या. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी पाटील यांनी तातडीने कॉलेजमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकार जाणून घेतला. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे तपास करीत आहेत.
पैशांसह महत्त्वाचे फाईल्स लंपास
पाहणी केली असता, अकाउंट विभागातील लेखापालाचे काउंटर आणि कपाटातून विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची जमा केलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. यासह ५ हजार रुपये किमतीचा हायव्हिजन कंपनीचा सीसीटीव्ही एन. व्ही. आर. देखील चोरून नेण्यात आला होता. चोरट्यांनी कपाटे व काउंटरचे मोठे नुकसान केले होते, तसेच कार्यालयातील फाईल्स व इतर दस्तऐवज अस्ताव्यस्त फेकले होते.
सीबीएसई शाळेतही चोरीचा प्रयत्न
दरम्यान, जवळच असलेल्या गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) च्या अकाउंट ऑफिसमध्येही चोरट्यांनी घुसखोरी केली, तेथील कपाटे आणि साहित्याची फेकाफेकी केली; मात्र सुदैवाने तेथून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही.