जळगाव : दोन महिला रस्त्याच्या कडेला पायी चालत जात होत्या. पाठीमागून पायी येत असलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सुमारे ४८ हजार किमतीची सोन्याची मंगलपोत हिसकावली. लागलीच तो रस्त्याने पळत पसार झाला. गुरुवारी (३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील का. उ. कोल्हे विद्यालयाच्या मागील गेटजवळ जुना खेडी रस्त्यावर घडली.
मनीषा विनोद बारी (वय ४६, रा. स्वप्नशील अपार्टमेंटजवळ, जुना खेडी रोड) या गृहिणी शेजारील उषा पुंडलिक देवरे यांच्यासह दोघी जणी रस्त्याच्या कडेने बोलत जात होत्या. या महिलांच्या पाठीमागून अंदाजे २५ वर्षीय संशयित तोंडाला रूमाल बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याजवळ आला. त्याने मनीषा बारी यांच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा शुक्रवारी (४ एप्रिल) दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी जाऊन प्रकार लक्षात घेतला.
पैशांच्या वादातून फायटरने मारहाण
जळगाव : व्याजाच्या पैशांची मागणी करत तिघांनी एकाला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अन्य एकाने फायटर मारत दुखापत केली. या घटनेत रिक्षाचालक शेक शाकील शेख गुलाब (वय ४३, रा. मास्टर कॉलनी, गणेशपुरी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (३ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जोशी पेठ परिसरात लाकूड वखारीजवळ घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार शुक्रवारी गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे, मयूर या चौघांवर शनिपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार परीश जाधव हे तपास करीत आहेत.
हॉर्न वाजविल्याच्या रागात दगडाने चालकास केले जखमी
जळगाव : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने दुचाकी थांबवित संशयिताने दुचाकी चालकाशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलत कपाळावर मारला. यात दुचाकी चालक संजय भास्कर पाटील (वय ३३, रा.धानवड) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी (३ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धानवड (ता. जळगाव) येथे भवानी माता मंदिराजवळ घडली. तक्रारीनुसार याप्रकरणी जयेश सुभाष वंजारी (रा. चिंचोली, ता. जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (४ एप्रिल) गुन्हा दाखल झाला. हवालदार मुकुंद पाटील हे तपास करीत आहेत.