साक्री : चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून सामोडे येथे चक्क एकाच रात्री सहा घरे फोडल्याची घटना घडली आहे. यात चोरटयांनी रोकडसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, शेतकऱ्याने आदल्या दिवशीच सोयाबीन विकून आणलेले पैसे चोरट्यांनी नेले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील फकिरा राघो घरटे या शेतकर्यांचे घर चोरट्यांनी फोडले. शेतकर्याने आदल्या दिवशीच सोयाबीन विकून आलेले पैसे हे कांद्याची लागवड करण्यासाठी पत्र्याच्या कोठीत बाजरीमध्ये ठेवलेले 55 हजार रुपये व त्यांच्या पत्नी चंद्रभागा फकिरा घरटे यांच्या पेटीतून 9 हजार 500 रुपये अशी 64 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिंदे गल्लीतील मधुकर वेडू शिंदे यांच्या घराकडे वळवला. या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.
घरातील चार कपाट, एक पेटी व सर्व साहित्य अस्ताव्यस्त करीत संपूर्ण घराची झडती घेतली. परंतू चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. शिंदे दाम्पत्य पायी वारीला गेले असल्याने घरातून काही मुद्देमाल चोरीस गेला किंवा नाही हे समजू शकले नाही. त्यानंतर चोरट्यांनी भररस्त्यावरील सेवानिवृत्त शिक्षक पंढरीनाथ राजाराम घरटे यांचे घर फोडले. घरातील दोन कपाटातील लॉकर तोडून पाहिले असता चोरट्यांना किरकोळ ऐवज हाती लागला. त्यामुळे चोरट्यांनी महात्मा फुले चौकातील सुनील राजाराम पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटे व कोठयामधील साहित्य अस्ताव्यस्त केले.
पंरतू येथेही त्यांच्या हाती काही लागले नाही. येथून चोरट्यांनी पिरबाबा गल्लीतील राजेंद्र साहेबराव भदाणे यांच्या मालकीचे जवळ जवळ असणार्या दोन्ही घरांचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील कपाटे, लॉकर तोडून तसेच कॉट मधील साहित्य अस्ताव्यस्त करून झडती घेतली. त्यात किती ऐवज चोरट्यांच्या हाती लागला हे घरमालक बाहेर गावी असल्याने समजु शकले नाही.
चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नाना कृष्णा कॉलनी व दत्तनगर येथेही एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी केली होती. तर गेल्या महिन्यात दोन शेतकर्यांचा दोन लाखांचा ऐवज रात्रीतून चोरून नेला. काल पुन्हा दि.8 रोजी रात्रीतून सहा घरफोड्या झाल्या.