Jalgaon Crime News : बंद घरातून ५८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

जळगाव :  बंद दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. बेडरुममध्ये ठेवलेले किमती दागिने, रोकड असा सुमारे ५८ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले. जुनाखेडी रोडवरील सदाशिवनगरात ही घटना मंगळवार, २३ रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीनुसार मंगळवार, २३ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नितीन निना सुरवाडे (वय ३१, रा. प्लॉट नं. १२, सदाशिवनगर) याठिकाणी वास्तव्यास आहेत. नोकरी करुन ते उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त रविवार, २१ रोजी दुपारी एक वाजता दरवाजाला कुलूप लावून ते बाहेर पडले. त्यानंतर ते मंगळवार, २३ रोजी सकाळी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घराच्या बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. कपाटाचे लॉकर्स उघडे होते. लॉकर्स व पर्समध्ये ठेवलेले दागिने त्यांना दिसले नाही. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तक्रार शनिपेठ पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जावून पाहणी करुन माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार रघुनाथ पवार करीत आहेत.

असा गेला मुद्देमाल

१७ हजार ५०० रुपये किमतीची साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची बदाम आकाराची लेडीज अंगठी, १७ हजार ५०० रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, आठ हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची अंगठी, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा. चार हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाची सोन्याची सटी, ६,२८५ रुपये किमतीचे मुलाचे चांदीचा सेट त्यात चांदीचा चमचा, वाटी, ग्लास व पेंडल, पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ५८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.