---Advertisement---
चाळीसगाव : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सुयश लॉन्स परिसरातील हिरापूर रोड भागात एका बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे २ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आबासाहेब देवराम जाधव (वय ६२, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे २४ मार्च ते ३० मार्च दरम्यान काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. या काळात त्यांचे घर बंद असल्याचे लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांनी संधी साधली.
चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून त्यातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २,५३,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
३० मार्च रोजी सायंकाळी जाधव घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना संशय आला. घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी १ एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कामाला लावण्यात आली आहेत.
दरम्यान, शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.









