प्रस्थापितांविरुद्ध अल्पसंख्याकांची ही लढाई : प्रफुल्ल लोढा

जळगाव : जळगाव मतदारसंघात कुणाला लाभ होण्यासाठी नाही, तर विकासासाठी उमेदवारी दिली असून, प्रस्थापितांविरुद्ध अल्पसंख्याकांची ही लढाई असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जळगाव मतदारसंघातील उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी सांगत आपला आत्मा जागृत करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील जिल्हा पत्रकार भवनात रविवार, 14  एप्रिल रोजी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, तालुकाध्यक्ष प्रवीण सपकाळे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख राहुल सुरवाडे, मनोज अडकमोल, राहुल भालेराव, हेमंत सोनवणे, संपर्कप्रमुख आधार कांबळे आदी उपस्थित होते.

लोढा यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह प्रस्थापित भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अन्य पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधला. लोढा म्हणाले की, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून काही पक्षांकडून मतांचा जोगवा मागितला जात आहे. सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे रक्षक असूनही त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपने अद्याप जाहीर केली नाही. ते दिल्लीत ठाण मांडून मुंबई फिरून आले. उदयनराजे यांची दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेते दोन-दोन दिवस भेट देत नाहीत. त्यांना उमेदवारीसाठी तळपवले जाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा वापर करून मते मागितली जात असून, हिंदू- मुस्लीम जनसमुदायात वाद निर्माण करण्याची प्रस्थापित पक्षाची रणनीती असून, देशात हुकूमशाही सुरू केली आहे. आता ती मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे, असेही लोढा यांनी नमूद केले. जळगाव मतदारसंघातून प्रस्थापित पक्ष व अल्पसंख्याकांची ही लढाई आहे. जगात पक्ष किंवा नेता मोठा नसून, मतदारच सर्वांत मोठा पक्ष आहे. आपली आत्मा जागृत करा, असे मतदारांना आवाहन करून मतदार हेच सर्वश्रेष्ठ आहेत. मतदारांच्या हातीच नेत्यांना राज्याच्या सत्तापीठावर बसविण्याची ताकद आहे. जळगाव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल, असा दावाही लोढा यांनी केला.