दृष्टिक्षेप
– उदय निरगुडकर
लंडनमधील भारतीय दूतावासावर रविवारी खलिस्तानवाद्यांनी जवळपास हल्लाच चढवला. खलिस्तानचे झेंडे नाचवले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. पुढे निदर्शने आक्रमक आणि हिंसक बनली. आंदोलक दूतावासाच्या इमारतीवर चढले आणि भारतीय झेंडा उतरवला. एक प्रकारे त्याची विटंबनाच झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून चित्रपटात जसे शेवटी येतात तसे लंडनचे बॉबी (पोलिस) अवतरले आणि काही वेळ आंदोलक आणि बॉबी यांच्यात तुंबळ धुमश्चक्रीदेखील झाली. हा झालेला प्रकार भयानकच! हिंसक कारवाया आणि गुंडगिरीचे हे दर्शन या शहरात चालणार नाही, असे लंडनचे महापौर सादिक खान यांनी बजावले. इकडे भारतात सोमवारी परराष्ट्र खात्याने इंग्लंडच्या दूतावासातील उच्च राजनैतिक अधिका-यांना बोलावून खडसावलं. पोलिसांची सुरक्षा उशिरा आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनकत्र्यांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यावेळी या राजनैतिक अधिका-यांना व्हिएन्ना शांतता कराराची जाणीव करून देण्यात आली आणि कर्तव्यपालनाची कठोर आठवणदेखील केली गेली.
‘वारिस पंजाब दे’ या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगवर भारतात कडक कारवाई सुरू झाल्यामुळे हे कृत्य केले गेले. लंडनमधील ताजी निदर्शने ही प्रातिनिधिक स्वरूपाची आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया म्हणायला हवी. अर्थात भारताच्या तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, हे दर्शवताना लंडनमधील भारतीय दूतावासाने लगेचच अनेकपट मोठा तिरंगा त्या इमारतीवर फडकवला. पण त्यामुळे झाल्या प्रकाराचे गांभीर्य काही कमी होत नाही. हे सर्व पाहून भारतातील इंग्लंडचे उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी लगेच घडल्या प्रकाराचा निषेध करणारे ट्विट करून भारत-इंग्लंड संबंध अधिक तणावपूर्ण होणार नाहीत, याची काळजी घेतली. इंग्लंडमधील भारतविरोधी निदर्शने ही काही आजची घटना नाही. २०१९ मध्ये अनिवासी पाकिस्तानी ब्रिटिश नागरिकांनी विविध ठिकाणी अशीच निदर्शने केली होती. त्या आधी खलिस्तानवाद्यांनी अमेरिका, कॅनडा इत्यादी देशात असे प्रकार केले होते. मग झाल्या प्रकारानंतर प्रश्न पडतो की, भारतविरोधी निदर्शनांसाठी इंग्लंड, कॅनडा हे देश खास जागा बनत आहेत का?
या सा-या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे अमृतपाल सिंग हा तरुण. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तो जालंधरहून फरार झाला. पोलिसी छाप्यात थोडक्यात बचावला. अवैध शस्त्रांनी भरलेली त्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात आली. तो निसटला पण त्याचे अनेक साथीदार आणि नातलग पोलिसांच्या ताब्यात आले. सीआरपीएफच्या पलटणी गस्त घालून पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करीत आहेत. अमृतपाल सिंगने शरण यावे, असे आवाहन त्याच्या कुटुंबाने केले आहे. पण त्याला भीक घालेल इतकं हे ‘वाट चुकलेला मुसाफिर’ म्हणण्यासारखंं साधं प्रकरण नाही. त्यामुळेच की काय, गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब अशांत बनवला गेला आहे. इंटरनेट आणि एसएमएस सुविधा काही भागात बंद होत्या. याच पृष्ठभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंतसिंग मान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अर्थात त्या भेटीला पृष्ठभूमी होती ती अजनाला या पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याची. हे पोलिस ठाणे पाक सीमावर्ती भागातील. त्यावर हल्ला केला तो अमृतपाल सिंग याच्या खलिस्तानवादी समर्थकांनी. तोही लाठ्या-काठ्या घेऊन नव्हे तर तलवारी आणि बंदुका घेऊन आणि तिथून स्थानबद्ध केलेल्या त्यांच्या गुन्हेगार कार्यकर्त्यांची पोलिस कस्टडीतून बळजबरीने सुटका करण्यात आली. हे सर्व भीषण आहे. ही दुस-या फाळणीची नांदी आहे, अशी भीती अनेकांना वाटते. त्यामुळे पंजाबमध्ये आता ८० च्या दशकातील रक्तरंजित इतिहास पुनरुज्जीवित होणार नाही ना, अशी भीती वाटतेय.
खलिस्तानची प्रमुख मागणी आहे ती स्वतंत्र राष्ट्राची. बरं, ही मागणी संपूर्ण समुदायाची नाही तर अमृतपालसारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे, दहशतवादी मानसिकतेचे, फुटीरतावादी नेते सोडले तर आज पंजाबात कोणीही ही मागणी करीत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये या मागणीचा साधा उच्चारदेखील झाला नाही. इतकेच काय, या अमरिंदरपालचे नावदेखील काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कोणी ऐकले नव्हते आणि आज त्याला पद्धतशीररीत्या ‘भिंद्रानवाले पार्ट २’ म्हणून प्रस्थापित केले जात आहे. त्यानेदेखील भिंद्रानवालेसारखीच वेषभूषा करून आपली दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. दीप सिद्धू हा एक थुकरट, बाजारू पंजाबी गायक. हे नाव सर्वप्रथम दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी पुढे आले. २६ जानेवारीला दिल्लीत निदर्शने करण्यात तो अग्रभागी होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृतपाल सिंग त्याच्या ‘वारिस पंजाब दे’ या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख बनला. त्यावेळी तो दुबईहून इथे अवतरला. त्याचाच कुख्यात हस्तक म्हणजे लवप्रीत सिंग. एका अपहरणातील आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आणि एफआयआर दाखल केला. एफआयआर मागे घ्यावा आणि लवप्रीतची ताबडतोब सुटका करावी यासाठी अमृतपालच्या चिथावणीवरून अजनाला पोलिस ठाण्यावर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. दुर्दैव म्हणजे पंजाब पोलिस त्याआधी काही दिवस या अमृतपालबरोबर शांततेसाठी चर्चा वगैरे करत होती. त्याच काळात त्याने या देशातील मंत्र्यांची अवस्था इंदिरा गांधींसारखी होईल, अशी धमकीदेखील दिली होती. यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे कळावे.
तर, खालिस्तानची मागणी ही आजची आहे का? ती मागणी भिंद्रानवालेने केली होती का? शेखर गुप्ता या संपादकांनी भिंद्रानवालेच्या अनेक मुलाखती घेतल्या. त्यातल्या एकाही मुलाखतीत त्याने खलिस्तानची मागणी केली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर हे बीज रोवले ते या देशावर राज्य करू पाहणा-या ब्रिटिशांनी. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध अनेक जाती-पाती, धर्म-पंथ यांनी एकत्र येऊन एक भारतीय म्हणून एकदिलाने लढले. त्यापासून धडा घेऊन ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब करत खलिस्तानच्या विषारी मागणीला पद्धतशीर खतपाणी घातले. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही शिखांसाठी पंजाबी सुभ्याची मागणी डोके वर काढतच होती. पुढे १९६६ मध्ये हिमाचल आणि हरयाणा हे हिंदी भाषिकांसाठी आणि पंजाब हे गुरुमुखी शिखांसाठी असे या प्रदेशाचे त्रिभाजन झाले. पुढे १९७१ मध्ये भारताच्या मदतीने बांगलादेश स्वतंत्र झाला. तत्कालीन पाक प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी ‘बांगलादेशच्या निमित्ताने जसा आमचा लचका तुटला, तसा तुमचा लचका तोडू’ या सूड भावनेने सीमावर्ती पंजाब प्रांतात खलिस्तानच्या मागणीला सर्व प्रकारचे सहाय्य पुरवले. आज दाखवल्या जात असलेल्या खलिस्तानच्या नकाशामध्ये पाकिस्तानमधील कोणताही प्रदेश समाविष्ट नाही, यातच सर्व काही आले. पुढे अकाली दलाने जम्मू-काश्मीरसारखे आपल्यालाही विशेष वसाहतीचे अधिकार मिळावेत, अशी मागणी लावून धरली आणि मग पुढे आनंदपूर साहिब ठराव आला.
आज जागतिक पटलावर भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताच्या प्रतिक्रियेकडे जगाचे लक्ष लागलेले असते. अशा वेळी भारतात अंतर्गत अशांतता माजावी असे वाटणाèया देशी-प्रदेशी शक्ती डोके वर काढतात. केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई उभी करतात. त्याला धर्म विद्वेषाची विखारी किनार देत दुबईहून आयात केलेला असा अमरिंदरपाल उभा केला जातो. हा प्रश्न चिघळवत ठेवण्यात पंजाब पोलिसांना काय मिळाले? पंजाब हे सीमावर्ती राज्य. तिथे धर्म विद्वेषाची बीजे पेरून केंद्र विरुद्ध राज्य असे भूत उभारून खलिस्तानची मागणी पुढे रेटली की, संपूर्ण देशभर शीखविरोधी वातावरण निर्माण होऊन शीख तरुणांना अधिकाधिक दहशतवादी बनवण्यात यश येईल, हा तो कुटिल डाव आहे. अमृतपालला आपण भारतीय असणेच मान्य नाही. भारतीय संस्कृतीही अमान्य आहे. इथली विविधता अमान्य आहे. आपली ओळख पुसली जातेय, असा खोटा प्रचार तो करतो. तोंडात भाषा शांततेची पण दुस-या क्षणी पोलिसांवर आरोप करत तो हिंसेचा आधार घेतो. भाषा ड्रगविरोधी लढण्याची आणि हेतू फुटीरतेचे विष पेरण्याचे. मग याला राजकीय समर्थन कोणाचे? बरे, हा निवडणूकही लढणार नाही. निवडणुकीला ताकद मिळावी म्हणून याचा वापर केला जातोय का? याच्या मागणीला घाबरून पंजाब पोलिसप्रमुखांची लवप्रीत या गुन्हेगारावरील एफआयआर मागे घेण्याची घोषणा अन् त्यातला निर्लज्जपणा म्हणजे हद्दच झाली. ही घोडचूक महागात पडणारी आहे. एकंदरीत, केंद्राने खलिस्तानची मागणी करणा-या दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करावा… यही समय है, सही समय है.