शिवसेनेतील ‘या’ नेत्याने धनुष्यबाणाचे चिन्ह हटवले, शिंदेंना बंडाचा इशारा ?

महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. यात 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांचा समावेश आहे. महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्यानं भाजप, राष्ट्रवादीसह शिवसेनेचे अनेक आमदार नाराज झालेत. त्यामुळे आता महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे.

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेतील बड्या नेत्यानी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.तानाजी सावंत यांनी त्यांच्या सर्वच सोशल मीडिया अकाऊंटवर मोठ बदल केला आहे. त्यांच्या या बदलानंतर तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिल्याचे बोललं जात आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलं आहे.

तानाजी सावंत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.

तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर केलेल्या या बदलामुळे ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तानाजी सावंत यांच्या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.