---Advertisement---
जळगाव : रिक्षामध्ये प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापणाऱ्या वसीम कय्यूम खाटीक (३३, रा. मास्टर कॉलनी) व तौसीफ सत्तार खान (३६, रा. रामनगर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली. दोघांना बऱ्हाणपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात जाऊन रिक्षामध्ये प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापून चोरी केली जात होती. या प्रकरणी बऱ्हाणपूर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे गुन्हे जळगावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्यूम खाटीक व तौसिफ सत्तार खान व त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, महेश सोमवंशी यांना कारवाईच्या सूचना देण्यात आली. पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली.









