Yogi Adityanath: “राजीनामा द्या, नाहीतर बाबा सिद्धिकीसारखा शेवट करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी

राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कसून शोध सुरू केला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नावाने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी येत्या 10 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. नाही तर त्यांनाही बाबा सिद्दिकी सारखे मारू, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज मिळाला होता.

योगी स्टार प्रचारक

महाराष्ट्रात आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. असं असलं तरी योगी आदित्यनाथ हे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व धामधूम सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बाबा सिद्धिकी हत्याकांड ही मुंबईतील एक गंभीर घटना होती. लॉरेंस बिश्नोई गँगच्या एका सदस्याने फेसबुक पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी सिद्धिकींचे संबंध अभिनेता सलमान खान आणि दाऊद इब्राहिमसारख्या अंडरवर्ल्डशी जोडले होते. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनी या धमकीला अत्यंत गंभीरपणे घेतले आहे.

मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर सुरक्षा यंत्रणा या प्रकरणी सतर्क झाल्या असून योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ देखील केली जाऊ शकते. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील सर्व डिजिटल पुरावे गोळा केले जात आहेत.