---Advertisement---
नवी दिल्ली : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टने तीन मौल्यवान कांस्य मूर्ती भारत सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मूर्ती तमिळनाडूतील मंदिरांमधून बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात आल्या होत्या.
व्यापक संशोधन आणि अभिलेखागार तपासणीतून पुष्टी झाली की, या चोल आणि विजयनगर काळातील मूर्ती भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून दशकांपूर्वी परदेशात विकल्या गेल्या होत्या. तामिळनाडूच्या मंदिरांमधून चोरीला गेलेल्या शिव नटराज (चोल काळ, सुमारे ९९०), सोमस्कंद (चोल काळ, १२ वे शतक) आणि परावईसह संत सुंदरार (विजयनगर काळ, १६ वे शतक) या मूर्ती दक्षिण भारतीय कांस्य कास्टिंगच्या समृद्ध कलात्मकतेची उदाहरणे आहेत. राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालयाने या तीन मूर्तीच्या उत्पत्तीची सविस्तर तपासणी केली, प्रत्येक कामाच्या व्यवहार इतिहासाची तपासणी केली.
तपासानंतर, संग्रहालयाने केवळ त्यांच्या परतफेडीची घोषणा केली नाही तर, शिव नटराजाची मूर्ती दीर्घकालीन कर्जावर ठेवण्याचा आणि तिच्या चोरीची आणि जगासमोर परत येण्याची संपूर्ण कहाणी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि हिमालयातील ज्ञानाची कला’ या प्रदर्शनाचा भाग म्हणून ती जगजाहीर केली जाईल.
२०२३ मध्ये, संग्रहालय संशोधकांनी, पुडुचेरी येथील फ्रेंच संस्थेच्या फोटो संग्रहाच्या सहकायनि, पुष्टी केली की या कांस्य पुतळ्यांचे फोटो १९५६ ते १९५९ दरम्यान तामिळनाडूतील मंदिरांमध्ये काढले गेले होते.
कोणती मूर्ती कुठली ?
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने या निष्कर्षांचा आढावा घेतला आणि पुष्टी केली की भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून पुतळे काढून टाकण्यात आले होते. संग्रहालय संचालक चेस एफ. रॉबिन्सन म्हणाले, ही शिव नटराजाची मूर्ती तंजावर जिल्ह्यातील श्री भाव औषधेश्वर मंदिराची होती, जिथे हे छायाचित्र १९५७ मध्ये काढण्यात आले होते. नंतर २००२ मध्ये, राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालयाने न्यू यॉर्कमधील डोरिस वेनर गॅलरीमधून ही कांस्य मूर्ती मिळवली.
संग्रहालयातील एका संशोधकाने सांगितले की डोरिस वेनर गॅलरीने पुतळ्याची विक्री सुलभ करण्यासाठी संग्रहालयाला बनावट कागदपत्रे दिली होती. सोमस्कंद आणि संत सुंदरार परवाई यांच्यासह ही मूर्ती १,००० वस्तूंच्या भेटवस्तूचा भाग होती. संशोधनातून असे दिसून आले की, ही मूर्ती मन्नारकुडी तालुक्यातील अलाथूर गावातील विश्वनाथ मंदिराची होती. शिवाय, शिव मंदिरातील संत सुंदरार परवाई यांची मूर्ती कल्लाकुरूची तालुक्यातील वीरसोलापुरम गावातील होती.









