जळगाव : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभेच्या १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिला टप्पा १ आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही ८ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक गुजरातची असली तरी याचे मोठे कनेक्शन जळगाव जिल्ह्याशी व मराठी माणसांशी आहे. याचं कारण म्हणजे, सुरत शहराचे उपनगर असलेल्या लिंबायत मतदारसंघातून ते तीन प्रमुख उमेदवार मैदानात उतरले आहेत ते मुळ जळगाव जिल्ह्याचे आहेत!
लिंबायत विधानसभा मतदारसंघांच सुमारे ८० हजार मराठी भाषिक मतदार आहेत. इथे भाजपचे व मुळ जळगाव जिल्ह्यातील सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. भाजपाने संगीता पाटील यांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना मैदानात उतरवले आहे.
आ. संगिता पाटील या पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक गावाच्या मुळ रहिवाशी आहेत. राजेंद्र पाटील यांच्याशी विवाहानंतर त्या लिंबायतवासी झाल्या. पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रूक प्रभ या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन बहिणीही असून दोन्ही विवाहीत आहेत. आमदार संगीता पाटील याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गुजरात विधानसभेत आतापर्यंत त्या दोनवेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे तिसर्यांदा तिकीट देऊन लिंबायत या त्यांच्या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गोपाल पाटील मैदानात असून ते देखील मूळचे अमळनेरचे आहे. १०वी पर्यंतचे शिक्षण आव्हाना हायस्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर ते कामधंदा निमित्ताने सुरतमध्ये गेले आणि सुरतचे रहिवाशी झाले. या मतदार संघातून आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना संधी दिली आहे.
पंकज तायडे मूळचे आडगाव कसारखेडाचे (यावल) रहिवासी आहेत. बांधकाम मजूर म्हणून ते सुरतला आले आणि आता ते येथे बांधकाम ठेकेदार म्हणून ओळखले जातात. यामुळे मुळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या या तीन्ही दिग्गजांच्या लढाईकडे जळगाव जिल्ह्याचेही विशेष लक्ष लागून आहे.
निवडणूक गुजरातची ऑपरेशन ऑल आउट खान्देशात
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे. गुजरात राज्याला लागून असलेल्या नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. यात फरार आरोपींना ताब्यात घेणे तसेच अवैध दारू विक्री व वाहतूक करणार्यांवर मोठ्या कारवाया सुरू आहेत. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेला लागू आहे. जिल्ह्याचे पाच तालुके गुजरात राज्याला लागून आसल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणार्या वाहनांची गुजरात पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या पथकाने नवापूर शहरातील काही संशयितांची धरपकड केल्याची माहिती समोर आली आहे.