अडावद, ता. चोपडा : येथून जवळ असलेल्या कमळगाव, ता. चोपडा येथील शेत शिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला जळगाव येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत अजून सात जणांवर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, कमळगाव शिवारात नीलेश गोविंदा केंगे यांच्या शेतात सीताराम बारेला हे कुटुंबासह राहतात. दि.१८ जुलै रोजी रात्री सीताराम बारेला यांची मुले अंजली बारेला, रोहित बारेला यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा परस्पर दफनविधी करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मुलगा बादल बारेला हाही अत्यवस्थ झाल्याने त्याला दवाखान्यात आणत असताना त्याचाही मृत्यू झाला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात बादलचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर सीताराम बारेला यांची अवघ्या पाच महिन्याची बालिका आरती बारेला हिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या चौघा बालकांचे वय चार ते आठ वर्षांचे असल्याने ही घटना नेमकी कशामुळे झाली हे समजू शकले नाही. या घटनेत उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखीने त्रस्त आणखी आले.
मुकेश गणेश बारेला (८), सोनाली गणेश बारेला (१०), शिला गणेश बारेला (३०), दीपाली गणेश बारेला (१०), सुनीता गणेश बारेला (सर्व रा. कमळगाव, ता. चोपडा, १७), रेखा मुकेश बारेला (३५), मुकेश लक्षण बारेला (४८) दोन्ही रा. उनपदेव, ता. चोपडा यांच्यावर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, डॉ. कोमल गावंडे, कविता पाडवी, बबिता वळवी, छोटी बावस्कर, निवेदिता शुक्ल, शोभा चौधरी यांच्याकडून बाधितांवर शर्तीचे उपचार सुरू आहेत. बादल सीताराम बारेला याचे शुक्रवार १९ रोजी दुपारी शवविच्छेन करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी म्हणतात…
शवविच्छेदनाचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोवर घटना कशामुळे घडली याचा उलगडा होणार नाही. परंतु, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही, परंतु उपचारासाठी दाखल झालेल्यांची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.