जळगावात तीन घरे फोडली : साडेतीन लाखांचा ऐवज लंपास; घरी कुणी नसल्याने चोरट्यांनी साधली संधी

जळगाव : शहरातील अयोध्यानगरातील श्रद्धा रेसीडन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरात रविवारी सायंकाळनंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून संजय गोरखनाथ सिंग (वय ४३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीत सिंग यांच्या घरातून ३ लाख ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळेे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे.

या संदर्भात फिर्यादी संजय सिंग यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते एम.आय.डी.सी. तील अयोध्यानगर परिसरातील श्रद्धा रेसीडन्सी येथे रहातात. घरात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे रहातात. घटना घडली त्यावेळी सिंग हे ड्युटीवर होते तर पत्नी व मुले बरे नसल्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात गेले होते.

असा लंपास केला ऐवज
घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात प्रवेश करत गोदरेज कपाटातील लॉकर तोडून सुमारे ३ लाख ५२ हजाराचा ऐवज पळवून नेला. यात काही रोख रक्कम व दागिने होते.यात एक लाख रोकड, ४० हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २८ हजार रूपये किंमतीचे कानातील सोन्याचे टॉप्स, ३२ हजार रूपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ४० हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ६० हजार रूपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाच्या कानातील बाळ्या व झुमके, १२ हजार रूपये किमतीचे २० भार चांदीचे दोन पैंजन जोड, १६ हजार रूपये किंमतीचे चांदीचे ८ शिक्के, एक हजार रूपये किंमतीचे चांदीचे जोडवे, २४ हजार रूपये किंमतीचे अशोककुमार विश्‍वकर्मा यांच्या घरातील ६ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र असा एकूण ३ लाख ५३ हजार हजाराचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.