---Advertisement---
शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात १९ आणि २० जुलैला दोन दिवसांत हाणामारीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वादंगाने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शहादा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह दुखापतीचे गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे.
पहिली आणि गंभीर घटना १९ जुलैला रात्री अकराच्या सुमारास माहेश्वरी कोल्ड्रिंक्स दुकानासमोर घडली. या प्रकरणी गणेश रघुनाथ पाटील (वय ४०, रा. रोहिदासनगर, लोणखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून भरोसा नगीन मोरे, राजा यशवंत कोळी, किरण बादल ठाकरे, आझाद राजू ठाकरे आणि किरण शंकर पवार या पाच जणांनी स्कॉर्पिओ गाडीतून येऊन गणेश पाटील यांना ‘तू गावाचा नेता झाला आहेस का?’ असे बोलून मारहाण केली.
राजा यशवंत कोळी याने गणेश पाटील यांच्या तोंडावर मिरची पावडरसारखे लाल रंगाचे द्रव्य फेकले, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात जळजळ झाली. त्यानंतर रॉडने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, गणेश पाटील यांनी तो वार हाताने अडवला, ज्यामुळे त्यांच्या करंगळीला दुखापत झाली. संशयितांनी त्यांना गाडीत टाकून पळवून नेण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संदीप वाघ तपास करत आहेत.
याच घटनेत दुसरी फिर्याद समाधान यशवंत कोळी (वय २६, रा. योगेश्वर कॉलनी, लोणखेडा) यांनी दिली असून, गणेश रघुनाथ पाटील (रा. रोहिदासनगर, लोणखेडा) याने जुन्या भांडणाच्या कारणावरून समाधान कोळी यांच्या खिशातून लोखंडी फायटर काढून त्यांच्या तोंडावर डाव्या बाजूला आणि कपाळावर मारून दुखापत केली. याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक अविनाश कोकणी तपास करत आहेत.
तिसरी घटना २० जुलैला दुपारी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना लोणखेडा गावात वल्लभभाई पतसंस्थेच्या पुढे घडली घडल्याचे सांगण्यात आले. सुनील शंकर पवार (वय २४, रा. अंबाजीनगर, लोणखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश पाटील, भुऱ्या निंबा ठाकरे आणि संजय पवार जाकीर (सर्व रा. लोणखेडा) यांनी कोणत्याही कारणाशिवाय सुनील पवार यांना मारहाण केली.
गणेश पाटील याने फायटरने त्यांच्या डोक्यावर मारले, तर इतरांनी हात धरून पाठीवर आणि पोटावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार जितेंद्र सूर्यवंशी तपास करीत आहेत. सर्व घटनांमध्ये जुन्या भांडणांची कुरापत हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक नीलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.