---Advertisement---
पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील कायेसा शहरात असलेल्या सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल कायदाच्या अतिरेक्यांनी अपहरण केले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या घटनेवर घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि अपहरण केलेल्या भारतीयांची सुरक्षित सुटका करण्यासाठी माली सरकारला सर्व शक्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, मंगळवारी माली येथून तीन भारतीय नागरिकांचे अतिरेक्यांनी अपहरण केले. अपहरण केलेल्या भारतीयांची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्यासाठी माली सरकारला सर्व शक्य पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेत अल कायदा या अतिरेकी संघटनेचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुरुवातीला सशस्त्र हल्लेखोरांनी सिमेंट कारखान्यावर हल्ला केला, त्यानंतर तीन भारतीयांना सोबत घेऊन गेले. अल-कायदाशी संबंधित संघटना जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन अर्थात् जेएनआयएमने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बामाको येथील भारतीय दूतावास माली सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी, स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्था आणि डायमंड सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्कात आहे. भारत सरकार या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. मालीमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे तसेच सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.