---Advertisement---
शहादा तालुक्यातील राणीपूर गावात कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पाणी अंगणात साचल्याच्या कारणावरून घरात घुसून प्रौढासह त्यांचा मुलगा, पत्नी व मुलीला सळईसह हाता बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांतीलाल गुलाब गोसावी (वय ५०, रा. राणीपूर, ता. शहादा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. कांतिलाल गोसावी यांच्या घराचे पाणी आकेश गोसावी, अंबरसिंग गोसावी, योगेश अंबरसिंग गोसावी, हिरालाल अंबरसिंग गोसावी आर्दीच्या अंगणात वाहत होते. याच कारणावरून अंबरसिंग गुलाब गोसावी, आकेश गोसावी, हिरालाल अंबरसिंग गोसावी, योगेश अंबरसिंग गोसावी आणि इतर दोन जणांनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी कांतिलाल गोसावी यांच्या घराचा
दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मारहाणीला सुरुवात केली.
आकेश गोसावी याने कांतिलाल गोसावी यांना मागून पकडले, तर अंबरसिंग गोसावी याने त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या पायावर सळईने वार करून त्यांना जखमी केले. योगेश अंबरसिंग गोसावी याने कांतिलाल गोसावींचा मुलगा प्रदीप याला पकडले, तर हिरालाल अंबरसिंग गोसावी याने त्याला सळईने डोक्यावर आणि उजव्या हातावर मारहाण करून जखमी केले.
याशिवाय, कांतिलाल गोसावींची पत्नी आणि मुलगी यांनाही अंबरसिंग गुलाब गोसावी आणि हिरालाल अंबरसिंग गोसावी यांनी हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करताना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धम कीही देण्यात आली. घटनेनंतर कांतिलाल गोसावी यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे आणि हवालदार संदीप चव्हाण तपास करीत आहेत.