जळगाव : अनैतिक संबंधाच्या वादातून आकाश पंडित भावसार (२७, रा. अशोकनगर) या तरुणाचा खून झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अनैतिक संबंधाच्या वादातून आकाश भावसार याचा खून झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणी अटकेतील अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी या तिघांची १३ मे रोजी पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गांजा सेवन केला, दोघांवर कारवाई
जळगाव : गांजा सेवन करणाऱ्या जोतमल तपेश्वर राठोड (२५) व वरुण रमेश गोयल (२१) दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी यांच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. १३ मे रोजी आरएल चौफुली परिसरात ते गांजा सेवन करताना आढळले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिफ्ट दिलेल्यांनी दुचाकी पळविली
जळगाव : वाटेत भेटलेल्या दोन अनोळखी इसमांना सोडण्यासाठी जात असलेल्या निखिल अनिल कोळी (२२, रा. रिधूर, ता. जळगाव) या तरुणाची दुचाकी व महागडा मोबाइल दोघांनी लांबविला. ही घटना मंगळवारी (१३ मे) रात्री दहा वाजेच्या सुमारास उस्मानिया पार्क परिसरात घडली. याप्रकरणी बुधवारी (१४ मे) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.