जळगाव : जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (वय २२ रा. यशवंत नगर, जळगाव ) व महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २४ रा. कुसुंबा ता. जळगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्षीत वाघुळदे हा तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तर त्याचे वडील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक आहे. सध्या सुट्टी असल्यामुळे लक्षीत हा काही दिवसांपूर्वी घरी आला होता. रविवारी तो घरातील वरच्या मजल्यावर एकटाच असताना त्याने गळफास घेतला. त्याचे कुटुंबीय त्याला बोलविण्यासाठी गेले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
तर महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २४ रा. कुसुंबा ता. जळगाव ) हा एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला होता. घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतला. पुरण पोळी करायचे खापर घेण्यासाठी त्याची आई त्या शेडमध्ये गेली, त्यावेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. महेशच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या दोन्ही काल रविवारी, गुढीपाडव्याच्या दिवशीच घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मामाकडे आलेल्या तरुणी संपविले जीवन
पारोळा तालुक्यातील भोंडण येथे मामाकडे आलेल्या नाशिक येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, रा.पाथर्डी फाटा, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीचे मामा सतीश सुखदेव सोनवणे (रा. भोंडण) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.