---Advertisement---
---Advertisement---
नंदुरबार : शहरात एका रात्री तीन वेगवेगळ्या वाहन शोरूम्समध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी टोयोटा शोरूम्स, उज्वल ऑटोमोटिक, आणि दिनेश व्हिल्स बुलेट शोरूमचे मुख्य दरवाजे तोडले, आत प्रवेश करून कागदपत्रे आणि सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. मात्र, चोरीला काहीच गेले नाही. सीसीटीव्हीतील फुटेजनुसार तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनुसार, गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे या दरम्यान या चोरीच्या घटना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील पातोंडा रस्त्यावरील टोयाटो शोरुम्सचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील कागदपत्रे तसेच इतर साहित्य अस्ताव्यस्त केले. याशिवाय धुळे रस्त्यावरील उज्वल ऑटोमोटिव्ह या शोरुममध्येही चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तसेच खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला.
तोच प्रकार तेथून काही अंतरावर असलेल्या दिनेश व्हिल्स व बुलेट शोरुम्समध्ये ही चोरट्यांनी केला. या तिन्ही ठिकाणी चोरीच्या उद्देशाने कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. सामान देखील नासधूस केला. परंतु चोरीला काहीही गेलेले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत टोयोटा शोरुमचे मॅनेजर प्रदीप नामदेव राणे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेश येलवे करीत आहे.
दरम्यान, माहितीगार व्यक्तींकडूनच हा प्रकार करण्यात तर आला नाही? चोरटे तिन्ही शोरुममध्ये आत शिरले, केवळ कागदपत्र आणि सामान अस्ताव्यस्त केले इतर वस्तू चोरीस का गेल्या नाहीत यासह इतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्या दृष्टीने तपास केला जात असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी सांगितले.