जळगाव : राष्ट्रीय महामार्ग सहा वर अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एरंडोल ते जळगावदरम्यान युपी ढाब्यासमोर भीषण अपघात घडला. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन मुक्ताईनगरला परतणाऱ्या शिक्षक दांपत्याच्या गाडीला कंटेनरची जोरदार धडक बसली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पतीसह तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर सध्या एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय 46) हे पत्नी रुपाली पाटील (वय 40) आणि तीन मुलांसह शिर्डीला साईबाबांचे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर सोमवार (दि. 24) रोजी मध्यरात्री 12.30 वाजता मुक्ताईनगरकडे परत येत असताना, एरंडोल-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर युपी ढाब्यासमोर हा अपघात घडला.
मारुती स्विफ्ट कार (क्रमांक MH-19-CQ-7009) भरधाव वेगाने जात असताना अचानक समोर आलेल्या कंटेनर क्रमांक WB-23-F9472 ला पाठीमागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट महामार्गाच्या डिव्हायडरवर आदळली. अपघातानंतर गाडीतील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात रुपाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शिक्षक राजेश पाटील आणि त्यांची तीन मुले खुशी, स्वरा आणि गुरु हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. तीन मुलांवर एरंडोल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीत कंटेनर चालकाने अचानक वाहन रस्त्यावर आणल्याने अपघात झाल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या जखमी होण्यास कंटेनर चालक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर सतत वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.