---Advertisement---
केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे ५.३० वाजता रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. यात पायलटसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका व्यावसायिकासह तिघांचा समावेश आहे. या अपघातानंतर, चार धामसाठी चालविण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह यांना वृत्तसंस्थेला सांगितले की, गुप्तकाशीसाठी सहा जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथील जंगलात कोसळले. जंगलात गवत कापत असलेल्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टरच्या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. अपघातग्रस्तांना तातडीने रुद्रप्रयाग येथील रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पायलटसह सात जणांना मृत घोषित केले.
दुर्घटनेत वणीच्या तिघांचा मृत्यू
केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी शहरातील कोळसा व्यवसायी राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी व दोन वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.राजकुमार जयस्वाल हे आपल्या परिवारासह केदारनाथ येथे दर्शनाला गेले होते. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानुसार, यात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात येथील प्रवाशांचा समावेश आहे.
या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या नांदेपेरा रस्त्यावरील कोळसा व्यापारी राजकुमार जयस्वाल, श्रद्धा राजकुमार जयस्वाल व काशी जयस्वाल या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी राजकुमार जयस्वाल यांनी मुलीच्या नावाने काशी महाशिवपुराण कथेचे आयोजन केले होते. यात हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. राजकुमार जयस्वाल हे मनमिळाऊ स्वभावाचे व कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असायचे. सुदैवाने यांचा मुलगा आजोबाकडे पांढरकवडा येथे असल्याने तो बचावला.