जळगाव : मिशन सिदूंर यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातून देखिल याच माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत ‘भारत माता कि जय, वंदे मातरम्, हम से जो टकरायेगा, मिट्टी में मिल जाएगा’ अशा घोषणांनी शहर अक्षरश: दणाणले होते.
मिशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा नायनाट केला. तसेच संपूर्ण जगाला भारतीय सैन्याने आपली ताकद देखिल दाखवून दिली. भारतीय सैन्याच्या या यशस्वी कामगिरीनिमीत्त देशभरात शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली.
जळगावात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगाव शहरात देखिल सकाळी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून यात्रेला सुरूवात झाली. या यात्रेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, भैरवी पलांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
शहर तिरंगामय
या तिरंगा यात्रेत सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा झेंडे घेत भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल घोषणा दिल्या. ‘भारत माता कि जय, वंदे मातरम्’ अशा विविध घोषणांनी शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ही तिरंगा यात्रा रेल्वे स्टेशन येथून नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, इच्छापूर्ती गणपती मार्गे येत शिवतीर्थ मैदानावर समारोप करण्यात आला. याठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.