अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी फडणवीस लिखित पुस्तक वाचावे ; अमोल जावळे यांचा विरोधकांना खोचक सल्ला

जळगाव :  केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून फेक नॅरेटिव्ह पसरविण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्यामुळे विरोधकांनी सुरू केलेल्या शेरेबाजीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघडे पडले आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्याला अर्थसंकल्पातले काही कळत नाही अशी जाहीर कबुली मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांचे हे अज्ञान आता उघड झाले असून, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पुर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी विरोधकांना दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मागणी केल्यास या पुस्तकाच्या प्रती त्यांना मोफत वितरित करण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या अज्ञानाची कबुली दिली होती, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता असलेल्या विविध प्रस्ताव आणि निधी वितरणाबाबत माहिती देताना अमोल जावळे म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी ४९९ कोटी, तर  बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी ४६६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी असलेला नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आता गति घेणार असून केंद्र सरकारने या प्रकल्पाकरिता ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

मुंबई, पुणे येथील मेट्रो प्रकल्पांकरिता २५८४ कोटींची तरतूद करण्यात आली असून मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता एक हजार ८७ कोटी, नागपूर मेट्रोकरिता ६८३ कोटी तर पुणे मेट्रोकरिता ८१४ कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहितीही अमोल जावळे यांनी दिली.

मुंबईकरिता महत्वाच्या असलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पाकरिता तरतूद करण्यात आलेल्या ९०८ कोटींच्या निधीमुळे उपनगरी रेल्वेसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे, तर महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा सूर काही विरोधी नेत्यांनी लावला असून काही माध्यमांनीही त्या सुरात सूर मिसळला आहे. अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा या विषयीच्या अज्ञानातून किंवा राजकारणातून हे घडू शकते. त्यामुळे या नेत्यांनी  फेक नॅरेटिव्ह पसरविण्याआधी अर्थसंकल्पाचे वाचन करावे किंवा जाणकारांकडून तो समजून घ्यावा असा सल्लाही अमोल जावळे यांनी दिला आहे.