वेध
– विजय कुळकर्णी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात ‘उबाठा’ च्या उपनेत्या Sushma Andhare सुषमा अंधारे सध्या भलत्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या विषयीची चर्चा ही त्यांनी एखादे चांगले काम केल्यामुळे नव्हे, तर त्यांनी अर्धवट माहितीच्या आधारे वारकरी संप्रदायाचे आदर्श संत ज्ञानेश्वरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे होत आहे. खरे तर, त्यांच्या विषयी काही लिहावे असे त्यांचे अजिबात काही कर्तृत्व नाही. पण त्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांविषयी व वारकरी संप्रदायातील संतांविषयी बोलताना, संत ज्ञानेश्वरांनी रेड्याला वेद म्हणायला लावले, पण आम्हाला पुस्तकं उपलब्ध करून दिली नाहीत, असे त्या म्हणाल्या. संत एकनाथ महाराज कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले, असा संदर्भ त्यांनी एका भाषणात दिला. याबाबतचा त्यांच्या भाषणाची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. या त्यांच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने अत्यंत तीव्र निषेध केला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार खंडन विश्व वारकरी सेनेने केले आहे. रेड्याला वेद म्हणायला लावले याचा अर्थ जाणून न घेता शब्दश: अर्थ घेऊन Sushma Andhare सुषमा बाईंनी टीका केली.
मुळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे ही त्या काळात पीडितच होती. त्यांच्या आई-वडिलांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकले होते. तर, संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवले जात होते. या भावंडांना मांडे खाण्याची इच्छा झाली तर कोणी त्यांना तवादेखील दिला नव्हता. एवढा अन्याय त्यांच्यावर त्याकाळी झाला. पण, तरीही संत ज्ञानेश्वरांनी दिव्य ज्ञानप्राप्ती करून रेड्याच्या मुखी वेद वदविले. म्हणजे, समाजातील अज्ञानी लोकांनादेखील ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञान देऊन शहाणे केले, असा त्याचा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर ‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे।’ हे ‘पसायदान’ विश्वात्मक देवाकडे मागितले. त्यात ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। तसेच दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥’ म्हणजे जे खळ म्हणजे दुष्ट आहेत त्यांना सत्कर्म करण्याची बुद्धी दे. ज्याला जे हवे असेल ते सुख त्यांना दे, अशी प्रार्थना त्यांनी विश्वात्मक देवाकडे केली. त्यांच्याविषयी Sushma Andhare अंधारे बाई म्हणतात, आम्हाला पुस्तकं उपलब्ध करून दिली नाही. अर्धवट माहिती आणि ज्ञानाच्या आधारे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या आराध्यांविषयी जी मुक्ताफळे उधळली त्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
वास्तविक वारकरी संप्रदाय अतिशय सहिष्णू आहे. त्यांना राजकारण, जातीभेद यात रस नाही. नव्हे, वारकरी संप्रदायात अठरापगड जातीतील संत आहेत. विठ्ठलाच्या वारीला सर्वच जाती-धर्मातील लोक जातात. त्यातूनच वारकरी संप्रदाय निर्माण झाला आहे. अशा वारकरी संप्रदायाच्या आराध्यांबद्दल कुणी अशी मुक्ताफळे उधळणे योग्य नाही. त्यामुळे Sushma Andhare सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करायचे नाही, अशी शपथ घेण्यापर्यंत विश्व वारकरी सेनेला पाऊल उचलावे लागते. यावरून बाईंनी केलेली टीका कशी व किती गंभीर असेल ते स्पष्ट होते. बरं, शिवसेनेच्या ज्या उबाठा गटात त्या आल्या त्या पूर्वी कुठे होत्या? तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्या त्यावेळच्या शिवसेना व हिंदुहृदयसम्राटांबाबत काय व कोणत्या भाषेत टीका करीत होत्या, हे सर्वश्रुत आहे. मग, त्यांना शिवसेना उबाठाने पक्षात घेतले कसे? त्यांना उपनेतेपद का दिले? हे अनाकलनीय आहे. तसेच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली? याचा विचार होणे देखील क्रमप्राप्त आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे माजी मुख्यमंत्री नेहमीच म्हणत असतात. मग, हिंदुत्वाचाच एक धागा असलेल्या वारकरी संप्रदाय आणि त्यांच्या आदर्श संत, देवदेवतांवर या बाई अशा टीका करीत असताना; त्यांना ते का थांबवत नाहीत. त्यांच्यातील निदान ते मानत असलेले हिंदुत्वही पुरते नष्ट करण्याचा हा महाविकास आघाडीतील त्यांच्या नव्याने झालेल्या मित्राचा डाव तर नाही? या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात नक्कीच मिळतील.
-8806006149