---Advertisement---
देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा प्रत्येक वर्षी पाचशे, हजार कोटीने वाढतच चालला असल्याचे समोर आले आहे. टोल वसुलीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रातील लोकांनी २१,१०५ कोटींचा टोल टॅक्स भरला आहे.
२०२०-२१ ते २०२४-फेब्रुवारी २५ पर्यंत या मागील पाच वर्षांत देशात २ लाख २० हजार ५९० कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून २७ हजार १४ कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला आहे. यानंतर राजस्थानमधून २४,२०९ कोटी, महाराष्ट्रातून २१,१०५ कोटी आणि गुजरातमधून २०,६०७ कोटींची टोल वसुली झाली.
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर ७५ पेक्षा जास्त टोल नाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने २१,१०५ कोटी १८ लाख रुपयांचा टोल दिला आहे. महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपासून टोलचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. अनेक पक्षांनी टोलमुक्तीचे दावे केले. अनेकांनी टोलनाके फोडले. मात्र, येथील टोल वसुली काही थांबली नाही.
त्यानंतर आता ही आकडेवारी समोर आली आहे. २०२०-२१ मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न २७,९२६ कोटी रुपये होते. २०२१-२२ मध्ये यात ६००२ कोटी, २०२२-२३ मध्ये १४,१०४ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ७८५० कोटी रुपयांचा टोल वसूल केला. २०२४-२५ फेब्रुवारी पर्यंत ५४,८२० कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला.
दरम्यान, वाहन चालकाना कमीत कमी अडथळा होईल अशा पद्धतीने टोल कलेक्शन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वाहकांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने टोल कलेक्शन बऱ्याच ठिकाणी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पाच वर्षांतील टोल वसुली
- २०२०-२१ २५९०.८५ कोटी रुपये
- २०२१-२२ ३३८६.२१ कोटी रुपये
- २०२२-२३ ४६६०.२१ कोटी रुपये
- २०२३-२४ ५३५२.५३ कोटी रुपये
- २०२४-२५ ५११५.३८ कोटी रुपये
- (फेब्रुवारी २०२५ पर्यंत)